‘फुले वाड्यातील कुटुंबांचे योग्य पुनर्वसन’; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : गंजपेठ येथे महात्मा फुले वाड्यात चांगले स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी काही जागा मिळणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुबांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल. त्यांना चांगला मोबदला दिला जाईल. या प्रकल्पासाठी 200 कोटींची तरतूद केली आहे. येत्या वर्षभरात या स्मारकाच्या कामाबाबत चांगली प्रगती झाली असेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री पवार यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. त्यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, स्मारकाच्या कामात कोणतेही राजकारण आणायचे नाही. याबाबत माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी मी चर्चा करणार आहे.
हेही वाचा – डॅा. सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने बजावली नोटीस
त्यांना उपोषणास बसण्याची वेळ येणार नाही, अशी काळजी आम्ही घेऊ. स्मारकासाठी जागा मिळण्याबाबत मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा केली, त्यांना या कामास गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे नागरिकांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यांच्याशी चर्चा करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे पवार यांनी सांगितले. पुर्नवसन करावे लागणाऱ्या नागरिकांना योग्य मोबदला, राहता येईल असे चांगले घर दिले पाहिजे. काही नागरिकांनी त्यास होकारही दिला असल्याचे पवार यांनी सांगितले.
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा असतो. सेवाभावी वृत्ती लक्षात घेता वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी काम केले पाहिजे. आता राज्यात धर्मादाय हॉस्पिटल असेल तर त्याचा उल्लेख सक्तीचे करण्यात येणार आहे. धर्मादाय रुग्णालयात निधी असतो. तो निधी वापरत का नाही? तो निधी पुजेसाठी असतो का? असा सवालही पवार यांनी केला.