Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

केरळमध्ये मान्सूनचे आगमन रेंगाळले; ‘एल निनो’मुळे यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

Monsoon Update 2026 | देशाची आर्थिक आणि कृषी वाहिनी मानल्या जाणाऱ्या नैऋत्य मान्सूनच्या आगमनाचा प्रवास यंदा चांगलाच रेंगाळला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केलेल्या नवीन अंदाजानुसार, मान्सूनसाठी आवश्यक असणारा पूर्व वाऱ्यांचा प्रवाह ५ ते ६ जूननंतरच सक्रिय होण्याची शक्यता आहे. परिणामी, केरळमध्ये यंदा मान्सूनचे आगमन अत्यंत संथ किंवा सौम्य गतीने होईल आणि त्यानंतर तो हळूहळू जोर पकडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यंदा मान्सूनने हवामान विभागाला चांगलेच हुलकावणी दिली आहे. आयएमडीने सुरुवातीला २६ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, हे वेळापत्रक चुकल्यामुळे आता २ ते ४ जून दरम्यान मान्सून अधिकृतपणे केरळमध्ये दाखल होऊ शकतो. सध्या केरळच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत, परंतु मान्सूनच्या अधिकृत घोषणेसाठी आवश्यक असणारे तांत्रिक निकष अजूनही पूर्ण झालेले नाहीत. उत्तर आणि पश्चिम भारतात सक्रिय असलेल्या ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे मान्सूनचा मार्ग अडवला गेला असून, हा प्रभाव कमी झाल्यानंतरच दक्षिण भारतात मान्सूनचे वारे मजबूत होतील.

अधिकृत मान्सून घोषणेचे ‘हे’ आहेत ३ नियम

हवामान विभाग मान्सून आल्याचे तेव्हाच घोषित करतो, जेव्हा खालील तीन अटी एकाच वेळी पूर्ण होतात:

  1. पाऊस: केरळमधील ६०% हवामान केंद्रांवर सलग पाऊस होणे आवश्यक आहे.
  2. वाऱ्यांचा वेग: अरबी समुद्रात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असावा लागतो.
  3. ढगांचे आच्छादन: उपग्रहाद्वारे (Satellite) क्षेत्रात पुरेसे ढगांचे आच्छादन दिसणे गरजेचे आहे.

हेही वाचा

नाले सफाईत ९२.३३ टक्के प्रगती; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर

सध्या केरळमध्ये पाऊस आणि ढगांची स्थिती अनुकूल आहे, परंतु अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग कमी पडत आहे. बंगालच्या उपसागरात नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनचे वारे कमकुवत झाले होते, मात्र ते आता हळूहळू वेग घेत आहेत.

‘एल निनो’चा धोका : पावसाच्या अंदाजात कपात

यंदा केवळ मान्सूनच्या आगमनालाच उशीर होत नसून, एकूण पावसाच्या प्रमाणावरही मोठे संकट ओढवले आहे. पॅसिफिक महासागरात सक्रिय होत असलेल्या ‘एल निनो’ या हवामान स्थितीमुळे यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सुरुवातीला आयएमडीने देशात ९२% पावसाचा अंदाज वर्तवला होता, परंतु त्यात आणखी कपात करून तो आता ९०% एलपीए (LPA – Long Period Average) करण्यात आला आहे. यामुळे यंदा देशात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

सध्या उत्तर आणि मध्य भारताला तीव्र उष्णतेच्या लाटेचा (हिटवेव्ह) सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामाच्या पेरण्यांसाठी शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. हवामान मॉडेलनुसार, सुरुवातीला मान्सूनची सुरुवात संथ असली, तरी आगामी काळात तो देशभरात कसा आणि किती वेगाने विस्तारतो, यावरच देशाच्या शेतीचे भविष्य अवलंबून असणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button