पुण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिसांकडेच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

पुणे : पुण्यातील सीसीटीव्ही प्रकल्प टप्पा १ मधील उभारलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती मे. अलाईड डिजिटल सर्व्हिस लिमीटेड या आस्थापनांकडे असून हे आस्थापन कुठलीही तक्रार आल्यास तात्काळ दुरुस्ती करते. पुणे शहरात एकूण ५१५१ आणि पुणे शहर पोलीस यांचे १३४१ असे एकूण ६४९२ सीसीटीव्ही आहेत. कॅमेऱ्यांचा स्विकारण्याकामी पुणे पोलीस नियंत्रण कक्ष तसेच संबंधित पोलीस ठाणे, पोलीस चौकी स्तरावर उपलब्ध करून दिलेला आहे, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केले.
यासंदर्भात सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभागृहाचे लक्ष वेधले होते. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून २०१५ मध्ये टप्पा क्र. १ मधून १३४१ सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. टप्पा २ मधून २८८६ अतिरिक्त कॅमेऱ्यांना मान्यता दिली असून त्याचे काम चालू आहे. टप्पा २ मधील कॅमेऱ्यांची दुरुस्ती व देखभालीसाठी ६ वर्षांची मुदत आहे. याचे काम मे. अलाईड डिजिटल सर्व्हिस लिमीटेड या कंपनीकडे आहे.
हेही वाचा – ज्येष्ठ अर्थतज्ञ डॅा. विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून उभारणी केलेले कॅमेऱ्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करण्यात पुणे पोलीस दलाचे स्वतंत्र असे नेटवर्क नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे. पुणे शहर पोलीस विभागाकडून टप्पा १ आणि २ मध्ये उभारण्यात आलेले कॅमेरे भारत संचार निगम लिमिटेड यांच्याकडून इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून कार्यरत आहे. पुणे मेट्रोकडून २२५५ तसेच पुणे स्मार्ट सिटीकडून ४३० कॅमेऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.