टी-20 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन बदलाची चर्चा शिगेला पोहोचली असताना आता आयपीएलमध्येही तब्बल तीन कॅप्टनवर टांगती तलवार!

IPL 2026: टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या कॅप्टनपदावरून सूर्यकुमार यादवची उचलबांगडी होणार अशी चर्चा रंगली आहे. आयपीएलमध्ये अत्यंत सुमार कामगिरीचा त्याला फटका बसला आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे या यादीत इशान किशनचे सुद्धा नाव जोडलं गेलं आहे. त्यामुळे ही चर्चा शिगेला पोहोचली असतानाच आयपीएल चालू (IPL 2026) हंगामात अनेक मोठ्या संघांची कामगिरी खालावल्याने तीन प्रमुख भारतीय खेळाडूंच्या कप्तानीवर टांगती तलवार आहे. ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे आणि अक्षर पटेल या तीन खेळाडूंना त्यांच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षित यश मिळवून देता न आल्याने, आगामी काळात त्यांच्याकडून नेतृत्व काढून घेतले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- ऋषभ पंत (लखनऊ सुपर जायंट्स – LSG)
या यादीत सर्वात मोठे नाव ऋषभ पंतचे आहे. लखनऊ सुपर जायंट्सने पंतला भली मोठी रक्कम देऊन संघात सामील केले होते, परंतु त्यांचा हा निर्णय यशस्वी ठरला नाही. लखनऊचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पंतने 11 सामन्यांत केवळ 251 धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट 138.67 राहिला आहे, जो आधुनिक टी-20 क्रिकेटच्या तुलनेत कमी मानला जातो. फलंदाजीसोबतच पंतच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सलामी जोडीतील सततचे बदल आणि फलंदाजीच्या क्रमातील प्रयोग संघाच्या अपयशाला कारणीभूत ठरले आहेत. फ्रँचायझी मालक संजीव गोयंका निकालांबाबत अत्यंत शिस्तप्रिय असल्याने पंतची खुर्ची धोक्यात आहे.
हेही वाचा – हायपरटेन्शन कमी करण्यासाठी मीठ कमी करणे नव्हे, ‘ही’ गोष्ट महत्त्वाची; डॉक्टर सांगतात..
- अक्षर पटेल (दिल्ली कॅपिटल्स – DC)
दिल्ली कॅपिटल्सने यंदा अक्षर पटेलवर विश्वास दाखवत त्याला कर्णधारपद सोपवले होते, मात्र तो प्रभावी ठरला नाही. फलंदाजीमध्ये अक्षरने 9 डावात केवळ 100 धावा केल्या. गोलंदाजीतही त्याने स्वतःचा पूर्ण वापर केला नाही; 12 सामन्यांत त्याने केवळ 36 षटके टाकली. दिल्ली कॅपिटल्सचे व्यवस्थापन पुढील हंगामात बदलांच्या तयारीत आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षरचे मूल्य कायम असले तरी, नेतृत्व गुणांच्या अभावामुळे त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते.
- अजिंक्य रहाणे (कोलकाता नाईट रायडर्स – KKR)
अनुभवाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला नेतृत्व दिले होते, पण हा डाव उलटला. रहाणेने 11 सामन्यांत 237 धावा केल्या, पण त्याचा 133 चा स्ट्राईक रेट केकेआरला सुरुवातीच्या षटकांत वेगवान धावा मिळवून देण्यात अपयशी ठरला. रहाणेच्या संथ फलंदाजीमुळे मधल्या फळीवर दबाव वाढला. 37 वर्षीय रहाणेसाठी आता केवळ कर्णधारपदच नाही, तर आयपीएलमधील त्याचे स्थानही धोक्यात आले आहे.
आयपीएलमध्ये केवळ नावापेक्षा कामगिरीला जास्त महत्त्व असते. या तिन्ही कर्णधारांच्या नेतृत्वाखालील संघांनी रणनीती आणि अंमलबजावणीमध्ये चुका केल्या आहेत. अहवालानुसार, आगामी ‘रिव्ह्यू मीटिंग’मध्ये फ्रँचायझी मालक आणि मॅनेजमेंट या कप्तानांच्या भविष्याबद्दल कठोर निर्णय घेऊ शकतात. 2027 च्या हंगामापूर्वी या तिन्ही संघांना नवीन कर्णधार मिळण्याची दाट शक्यता आहे.





