आग्र्यात छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक उभं राहणार; शासन आदेश जारी

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला ३९५ वर्षे पूर्ण झाली. आग्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केलं की आग्रा शहरात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैद करण्यात आलं होतं ती वास्तू महाराष्ट्र शासनातर्फे अधिकग्रहीत करुन त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात येईल.
आग्रा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा : महावितरण समस्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘‘साकडे’’
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
या शौर्य स्मारकामध्ये महाराजांचा जाज्वल्य इतिहास मांडला जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे उपक्रम संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट आदी राबविण्यात येणार आहेत.