आता मीटरने पाणीपट्टी आकारणी?

पुणे : समान पाणी योजनेअंतर्गत शहरात पाणी पुरवठ्याचे झोन तयार करण्यात येत आहेत. त्यातील ७२ झोनचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यासोबतच मीटर बसविण्याचे कामही पूर्ण केले जाणार असून त्यानंतर सोसायट्यांना मीटरद्वारे पाणीपट्टी आकारली जाणार असल्याचे आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. शहरात सध्या केवळ व्यावसायिक मिळकतींना मीटरद्वारे पाणीपट्टी आकारली जात आहे. तर, इतर मिळकतींची पाणीपट्टी मिळकतकरात आकारली जात आहे.
आयुक्त म्हणाले की, समान पाणी योजनेसाठी केंद्र शासनाकडून जेएनएनयुआरएम आणि अमृत योजने अंतर्गत निधी देण्यात आला आहे. त्यावेळी महापालिकेने योजना पूर्ण झाल्यानंतर मीटरद्वारे पाणीपट्टी आकारण्याच्या प्रस्तावास मुख्यसभेत मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा : ‘अबू आझमींना यूपीमध्ये पाठवा, आम्ही त्यांचा इलाज करू’; योगी आदित्यनाथ भडकले
सध्या, या योजनेचे काम शेवटच्या टप्प्यात असून मार्च २०२६ पर्यंत ८८ मधील शहरातील ७९ टाक्यांचे काम पूर्ण होईल. तसेच २ लाख ८० हजार मीटर बसविण्यासह, पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या १४१ झोनचे कामही पूर्ण झाले असेल. त्यामुळे, प्रशासनाकडून त्यानंतर नियमानुसार, मीटरद्वारे पाणीपट्टी आकारली जाईल.
शहरात सध्या व्यावसायिक मीटरधारकांची सुमारे ६५० कोटींची पाणीपट्टी असून गेल्या वर्षभरात केवळ २३० कोटींची वसूली झाली आहे. त्यामुळे, यापुढे या वसुलीबाबत विशेष उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.