ताज्या घडामोडीमुंबई

‘महा आघाडी’ त बिघाडी !

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासंदर्भात बोलावणे नसल्यामुळे काँग्रेस रुसली : शरद पवारही जाणार नाहीत !

मुंबई : हिंदी सक्ती संदर्भातील दोन्ही ‘जीआर’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्यामुळे ठाकरे बंधूंनी जाहीर केलेल्या विजयी मेळाव्याचे निमंत्रण काँग्रेस पक्षाला नसल्यामुळे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे मेळाव्यात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे, मेळाव्या आधीच ‘महा आघाडी’ मध्ये बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शुक्रवारी रंगीत तालीम..

मराठी भाषा, मराठी माणूस, आणि महाराष्ट्र यांच्या भल्यासाठी हिंदी सक्तीच्या विरोधात संघर्षाची भाषा केलेले उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या ‘विजयी मेळाव्या’ ची जय्यत तयारी झाली असून दोन्ही बाजूंनी पूर्ण नियोजन झाले आहे आणि त्या सभेची रंगीत तालीम शुक्रवारी होत आहे. या मेळाव्याचे दोन्ही बाजूंच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी ‘मिनिट टू मिनिट’ नियोजन केल्याचेही सांगण्यात येते.

काँग्रेसला निमंत्रण नाही..

ठाकरे बंधूंच्या भूमिकेशी सहमत असणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन ठाकरे बंधूंनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात केले होते. परंतु, निमंत्रण नसल्यामुळे काँग्रेसचे नेते सहभागी होणार नाहीत असे समजते.

जयंत पाटील म्हणाले.. नाही!

ठाकरे बंधूंच्या या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार जाणार नाहीत, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आमच्या अध्यक्षांचा निर्णय आम्हाला शिरसावंद्य असतो, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात वातावरण मात्र तापले!

हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. पहिली पासून हिंदीची सक्ती नको, अशी भूमिका राज्यातील अनेक संघटना आणि विरोधी पक्षांची होती. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्रित येऊन मोर्चा काढणार होते. परंतु, त्यापूर्वीच फडणवीस सरकारकडून त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द करण्यात आले. मात्र, आता त्याच दिवशी ठाकरे बंधू एकत्र येऊन विजयी मेळावा घेणार असून त्याचीही जय्यत तयारी झाली आहे.

हेही वाचा – जागतिकस्तरावर राज्यातील पर्यटन उद्योगाला पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर स्पर्धेच्या माध्यमातून चालना मिळणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मविआ’ मध्ये धुसफूस..

या विजयी मेळाव्याच्या मुद्द्यावरून महा विकास आघाडीत मात्र बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मेळाव्याचे निमंत्रण काँग्रेसला देण्यात आलेले नसल्याचा मुद्दा पुढे करून ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला आता शरद पवारही जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

ठाकरे बंधूंचा ‘मोठा इव्हेंट’ !

दि. ५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचे निमंत्रण पाठवले आहे की नाही? हेच समजू शकत नाही आणि ते काँग्रेसला मिळाले नसल्याचे म्हटले जात आहे. आम्हाला अजून तसे काही निमंत्रण मिळालेले नाही किंवा सांगण्यात आलेले नाही. कदाचित, हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा इव्हेंट असू शकतो. दि. ५ जुलै हा मोर्चा काढण्यासाठी दिवस ठरला होता. पण हा जीआर रद्द झाला आहे असे मला अजूनही वाटत नाही, कारण ‘महायुती’ ने यासंदर्भात डॉ. नरेंद्र जाधव समिती नेमली आहे. त्यामुळे ‘मुंह में राम, बगलमें नथुराम’ या भाजपाच्या नीतीपासून जपून राहणे आवश्यक आहे. दि.५ जुलैचा दिवस मराठी लोक साजरा करतील, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी दिली होती.

शरद पवार यांची भूमिका काय?

यानंतर आता शरद पवार हेही ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत. पत्रकारांशी संवाद साधत असताना शरद पवार यांना यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येऊन विजयी मेळावा घेत आहेत, यात तुमचा पक्ष सहभागी असणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, ठाकरे बंधूंच्या मेळाव्याबाबत माहिती नाही. आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे मला भेटले होते. ते म्हणाले होते की, या सगळ्या कामात आम्ही सहभागी होणार नाही. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांचा निर्णय हा आम्हाला शिरसावंद्य असतो, असे शरद पवार यांनी सांगितले. तुम्ही या मेळाव्याला जाणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर शरद पवार यांनी नकारात्मक उत्तर दिले. मी त्या मेळाव्याला जाणार नाही. माझे कार्यक्रम दुसरीकडे आहेत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

पृथ्वीराज चव्हाण यांचा सूर

दरम्यान, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस ही उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशीच युतीबाबत चर्चा करणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उद्धव सेनेशी जवळीक वाढल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हा त्यांचा घरगुती विषय आहे. एखादा व्यक्ती काँग्रेसच्या विचारांना पूर्णपणे विरोध करणारा असेल, तर आम्ही त्या युतीला आक्षेप घेऊ. अन्यथा, त्या दोघांनी एकत्र येणे, हा त्यांचा अंतर्गत मामला आहे.

राज म्हणजे गर्दी खेचणारा नेता..

राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते आहेत. ते आपल्या सभांमध्ये मोठी गर्दी खेचतात. मात्र, त्याचे मतदानात रुपांतर होत नाही. त्यामुळे सध्याच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाचे अस्तित्व जाणवत नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

गर्दी होईल पण मत परिवर्तनाचे काय?

ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्याकडे सत्ताधारी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अगदी बारीक लक्ष आहे. निवडणुका जवळ आल्या की या मंडळींना मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्राचे तुकडे असे शब्द आठवतात. त्या सभेला मोठी गर्दी होईल, पण त्या गर्दीचे पुढे मतदानामध्ये रूपांतर होत नाही, हे सत्ताधाऱ्यांनाच काय दोन्ही ठाकरेंना देखील माहित आहे, असे ‘महायुती’ चा नेता म्हणाला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button