ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा, मराठीसाठी मंगलमय सोहळा !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी हिंदी वादामध्ये यु-टर्न घेतला आणि हिंदी सक्ती बाबत असलेले जीआर रद्द केले. आपल्याच ताठर आणि भक्कम भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांवर नामुष्कीची वेळ आल्याची भावना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली आणि हा मराठी भाषेचा तसेच मराठी माणसाचा विजय आहे, असेही ठासून सांगितले. फडणवीस यांनी माघारीची ही भूमिका घेतली नसती, तर दोन्ही ठाकरेंचा प्रचंड मोठा मेळावा दि. ५ जुलै रोजी होणार होता, परंतु तो रद्द करून त्याचेच रूपांतर आता विजयी मेळाव्यात होणार आहे.
ठाकरे बंधूंचे सगळे ठरले !
मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र हे विषय आले की ठाकरे बंधू अक्षरशः पेटून उठतात. मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या असल्यामुळे ठाकरे बंधूंसाठी ही मोठी पर्वणी ठरली आहे आणि विजयोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी संपूर्ण कसब आणि ताकद पणाला लावली आहे, हे लक्षात घ्यायला हवे !
बऱ्याच वर्षांनी ठाकरे बंधू एका मंचावर !
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असून मेळाव्याच्या निमित्ताने वरळीतील ‘एनएससीआय डोम’ मध्ये मंचावर एकत्र दिसतील. वास्तविक, हिंदी भाषा पहिल्या इयत्तेपासून शिकवण्यासंदर्भातील शासन आदेश रद्द करण्यासाठी उद्धव सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी मोर्चा कढण्याचे ठरविले होते. मात्र, त्यापूर्वीच फडणवीस यांनी यासंदर्भातील दोन्ही शासन आदेश मागे घेत असल्याची घोषणा केली आणि मोर्चे रद्द झाले. त्यानंतर आता नियोजित तारखेलाच ठाकरे बंधू एकत्रितपणे विजयी मेळावा घेणार आहेत. हा मेळावा कसा असणार, याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या वारंवार बैठका..
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या नियोजनासाठी गेल्या काही दिवसांपासून दोन्ही सेनेंचे नेते एकमेकांना भेटत आहेत. बुधवारी रात्री मनसे आणि उबाठा गटाच्या नेत्यांची संयुक्त बैठक वरळी डोम येथे पार पडली. या बैठकीत मेळावा कसा व्हावा? यासंबंधी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला मनसेकडून बाळा नांदगांवकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब, सुनिल शिंदे हे नेते उपस्थित होते. या बैठकीत मेळाव्याची रुपरेषा निश्चित करण्यात आली.
मेळाव्याच्या नियोजनाचे मुद्दे..
मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची प्रत्येक गोष्टीची रंगीत तालीम शुक्रवारी केली जाणार आहे.
मेळाव्यात केवळ ठाकरे बंधूंची भाषणे होणार आहेत. इतर पक्षांचे अध्यक्ष आल्यास केवळ पक्षाध्यक्षांचीच भाषणे होतील असे ठरले आहे. व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्षांनाच स्थान दिले जाणार आहे. इतर सर्व नेते खाली व्यासपीठासमोर बसणार आहेत, अशा प्रकारचे नियोजन आहे.
मोजक्या नेत्यांची भाषणे..
ठाकरे बंधू आणि इतर सहकारी पक्षांचे अध्यक्ष आले तर ते अशी मोजकी भाषणे होतील. इतर कोणाचीही भाषणे होणार नाहीत. संजय राऊत, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे देखील व्यासपीठाच्या खालीच बसणार आहेत. सर्व नेत्यांचा सन्मान जपला जाईल, अशी आसनव्यवस्था असणार आहे. मेळाव्याचा केंद्रबिंदू मात्र ठाकरे बंधूच राहणार आहेत. शिवाय, मुंबईत जिथे शक्य असेल तिथे एलईडी स्क्रीन लावल्या जाणार आहेत. विजयी मेळाव्याचे थेट प्रक्षेपण लोकांना पहाता येणार आहे.
नियोजन ही संयुक्त जबाबदारी..
दोन्ही ठाकरेंचे पक्ष आणि त्यांचे नेते आपापला पक्षीय अहंकार बाजूला ठेवून या मेळाव्यासाठी झोकून देऊन काम करतील असे ठरले आहे. गर्दीचे नियोजन ही मेळाव्यातील दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार आहे.
दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम तयार करुन जबाबदारीचे वाटप केले जाणार आहे. वरळी डोममध्ये गर्दी झाल्यास डोमच्या गॅलरीही कार्यकर्त्यांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत. वरळी डोम परिसरात मोकळ्या जागेत अतिरिक्त शेड टाकून बैठक व्यवस्था केली जाणार आहे.
पोस्टरद्वारे डिवचणे नको..
बॅनरबाजी, पोस्टर, घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचले जाणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना केल्या जाणार आहेत. सोशल मीडिया, बॅनर, जाहिरातींद्वारे या मेळाव्याची जोरदार प्रसिद्धी केली जाण्याची जबाबदारीही दोन्ही पक्षांच्या विशेष टीमकडे सोपवण्यात आली आहे.
भाषणे खणखणीत होणार..
ठाकरे बंधूंची भाषणे मात्र खणखणीत होणार आहेत. यामध्ये आधी कोण बोलणार आणि नंतर कोण बोलणार याबाबत मात्र गोपनीयता ठेवण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना सुद्धा ते ऐनवेळी समजेल. या सोहळ्याला लाखोंची गर्दी होईल म्हणून चंगराचेंगरी टाळण्यासाठी देखील उपाययोजना करण्यात आले आहेत.
मतामध्ये परिवर्तन कसे ?
ठाकरेंच्या सभा म्हणजे प्रचंड गर्दी नेहमीच होते, पण प्रत्यक्षात त्याचे मतांमध्ये परिवर्तन होत नाही हा इतिहास आहे. याचाही अभ्यास करून उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे मतदानाची टक्केवारी कशी वाढेल, याचा विचार, तसे नियोजन आणि व्यूहरचना करण्यासाठी देखील विशेष समिती स्थापन झाली आहे. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती ५ जुलैची! ठाकरे बंधूंचा हा विजयी मेळावा म्हणजे मंगलमय सोहळा कसा होईल, यामध्ये सगळे गढून गेले आहेत !