मसाप मावळ शाखेच्या अभिवाचन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
अभिवाचन कार्यक्रमाने रसिक साहित्यप्रेमींची मने जिंकली

मावळ : महाराष्ट्र साहित्य परिषद, मावळ शाखेच्या वतीने आयोजित अभिवाचन कार्यक्रमाने रसिक साहित्यप्रेमींची मने जिंकली. अनंतराव चाफेकर सभागृहात भरगच्च उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात कथा आणि संहितांच्या प्रभावी सादरीकरणाने साहित्याच्या जिवंत अभिव्यक्तीचा अनुभव रसिकांना मिळाला.
या कार्यक्रमात व.पु. काळे लिखित ‘शोध’, श्रीकृष्ण पुरंदरे लिखित ‘हमारा लल्ला’ आणि योगेश सोमण लिखित ‘संहिता’ या कथा आणि संहितांचे अभिवाचन करण्यात आले. सौ. सारिका सुतार, हर्षल आल्पे आणि श्रीकृष्ण पुरंदरे यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने कथा रसिकांसमोर प्रभावीपणे उलगडल्या.
हेही वाचा – श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास, भाविकांची बाप्पाचं दर्शन घेण्यास अलोट गर्दी
साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला साहित्य व कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ कवी सुरेश अत्रे यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची गरज व्यक्त करत रसिकांचा उत्साह पाहून आनंद व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हॉईसओव्हर आर्टिस्ट संजय हिरवे यांनी नव्या पिढीपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचावे यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे महत्त्व सांगितले. तसेच, ज्येष्ठ अभिनेते मोहन खांबेटे यांनी या अभिवाचन सोहळ्याच्या दर्जाबद्दल आयोजकांचे आणि कलाकारांचे विशेष कौतुक केले.
संस्कारक्षम साहित्याच्या प्रसारावर भर
मसाप मावळ शाखेच्या या अभिनव उपक्रमामुळे साहित्यप्रेमींसाठी एक वेगळा अनुभव निर्माण झाला. प्रभावी अभिवाचन, कसदार लेखन आणि रसिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. आयोजकांनी यापुढेही असे प्रयोग सुरू ठेवावेत, अशी मागणी साहित्यप्रेमींकडून केली जात आहे.