‘पुरंदर’साठी जूनपर्यंत भूसंपादन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एक जूनपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भातील जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत.
विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये तीन हजार एकर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. या भूसंपादनासाठी ९६ टक्के शेतकऱ्यांची संमतिपत्रे दिली आहेत. भूसंपादन करण्यासाठी सुमारे सहा हजार कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी कर्ज स्वरूपात उभारण्याचे यापूर्वी निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार ‘हुडको’ या संस्थेकडून कर्ज घेण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या कर्जास हमी देण्यासही राज्य शासनाने मान्यता दिली असून, त्यासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची (एसपीव्ही) स्थापना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भूसंपादनाची प्रत्यक्ष प्रक्रिया येत्या एक जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
हेही वाचा – प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती सत्र आयोजित
दरम्यान, मोबदल्याची रकमेसंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ३२ (१) कलमानुसार परिपत्रक जारी करून दर निश्चित करणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम दिली जाणार आहे. या रकमेचे वितरण झाल्यानंतर तातडीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.




