डॉ. सुशांत पाटील ग्रुप करंडक 2K26 ग्रँड फिनाले उत्साहात संपन्न

पिंपरी-चिंचवड : डॉ. सुशांत पाटील ग्रुप करंडक 2K26 या प्रतिष्ठित आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी पुण्यातील 50 हून अधिक महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ग्रँड फिनाले सोहळा अत्यंत दिमाखात आणि उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांच्या कला आणि कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नृत्य, गायन, लाईव्ह बँड आणि फॅशन शो अशा विविध कलाप्रकारांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला होता. सर्व स्पर्धकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले असून स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली.

डॉ. सुशांत पाटील सर आणि ॲड. अनुजा पाटील मॅडम यांच्या दूरदृष्टी आणि मार्गदर्शनामुळे डॉ. सुशांत पाटील ग्रुप करंडक 2K26 यशस्वीपणे पार पडला.

या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सुरेश माळी, प्राचार्य डॉ. सुरेश शिर्भदुरकर, संचालक डॉ. मेघना भिलारे आणि श्री. प्रदीप खांडवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व विभागप्रमुख आणि सांस्कृतिक समिती सदस्यांनी विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
हेही वाचा – ‘पुरंदर’साठी जूनपर्यंत भूसंपादन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे मान्यवर परीक्षक मंडळ. गायन स्पर्धेसाठी बहुआयामी गायक आणि संगीतकार सौरभ साळुंके उपस्थित होते. फॅशन शो आणि नृत्य स्पर्धेसाठी अभिनेत्री आणि मॉडेल पिया कोसुंबकर या परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. तसेच अभिनेते व दिग्दर्शक आलोक बेस्के, नृत्यदिग्दर्शक हेमंत पानसरे आणि नृत्यदिग्दर्शिका सुचित्रा मोहंती यांनी परीक्षक म्हणून उपस्थित राहून स्पर्धेला चारचाँद लावले.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन अँकर कोमल यांनी केले.
या भव्य कार्यक्रमाची उत्कृष्ट मांडणी आणि नियोजन क्रिएटिव्ह आणि कल्चरल डायरेक्टर प्रा. श्रेयस देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली उन्मेष कोर्डे, तनमय मुत्तलवार, मंगेश ढोले, सिद्धू जाधव, भावना शिंदे, सारिका पाटील, श्वेता पडाळे, श्रुती इंगोले, जय पटोले, राजू पासलकर तसेच विद्यार्थी परिषद सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन केले.

विजेते आणि उपविजेते यांच्यासह सर्व सहभागी स्पर्धकांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या स्पर्धेमुळे पुण्यातील आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धांना एक नवे व्यासपीठ मिळाले असून पुढील वर्षी हा सोहळा अधिक भव्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




