‘ग्लास स्कायवॉक’च्या मार्गातील सर्व अडथळे दूर, ‘पीएमआरडीए’ उभारणार पर्यटन प्रकल्प निविदा प्रक्रिया सुरू
लोणावळा शहराजवळील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट प्रकल्पाच्या मार्गातील जवळपास सर्वच अडथळे दूर

लोणावळा : लोणावळा शहराजवळील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे उभारण्यात येणाऱ्या ‘ग्लास स्कायवॉक’ (Glass Skywalk At Lonavala) प्रकल्पाच्या मार्गातील जवळपास सर्वच अडथळे आता दूर झाले आहेत. तसेच या प्रकल्पासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे लवकरत पुणे जिल्ह्याच्या पर्यटनस्थळामध्ये नव्या पर्यटनस्थळाचा समावेश होणार आहे.
पर्यटननगरी लोणावळा शहरासह मावळ तालुक्यातील पर्यटन विकासाबाबत मुंबईत नुकतीच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत लोणावळा जवळील ग्लास स्कायवॉक प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. लोणावळा परिसरातील निसर्गसंपदा लक्षात घेता येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी व साहसी खेळ सह इतर सुविधांचा समावेश असलेला ‘ग्लास स्कायवॉक’ उभारावा. या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करावे, अशा सूचना अजित पवार यांनी बैठकीत दिल्या होत्या.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये ३६ ‘मिसिंग लिंक’
पर्यटन विभागाने प्रकल्पासाठी असमर्थतता दर्शविली. त्यामुळे अजित पवार यांनी पर्यटन विभागाऐवजी ‘पीएमआरडीए’ने (PMRDA) या प्रकल्पाचे काम हाती घ्यावे, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ‘पीएमआरडीए’ने हे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य शासनाची मान्यता घेऊन आराखडा तयार केला. त्याला पर्यावरण विभागाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.
ग्लास स्कायवॉक प्रकल्पाविषयी
– टायगर पॉइंट व लायन्स पॉइंट येथील प्रस्तावित प्रकल्प
– जवळपास 4.84 हेक्टर परिसरात प्रकल्प उभारण्यात येणार
– झीप लायनिंगसारखे साहसी खेळ, फूड पार्क, अँम्फी थिएटर, ओपन जीम व विविध खेळ
– प्राथमिक अंदाजानुसार जवळपास शंभर कोटी रुपयांहून अधिकचा खर्च अपेक्षित