वाहतूक सक्षमीकरणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ११.३ किलाेमीटर अंतराचे पर्यायी रस्ते!
प्रशासनाचे सर्व्हेक्षण : शहरात वाहतूक काेंडीचे तब्बल २५ चाैक आढळले

पिंपरी : शहरात २५ वाहतूक काेंडीचे चाैक आढळून आले आहेत. वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी विविध उपाय याेजना करण्यात येणार आहेत. त्यासाठी एक काेटींची तरतूद करण्यात आली आहे. ११.३ किलाेमीटर अंतराचे पर्यायी रस्ते (मिसिंग लिंक) विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी १२२ काेटी रुपये खर्च केला जाणार आहेत. विकास आराखड्यातील ४८.९४ किलाेमीटरचे ३४ रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी ८०९ काेटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात जमा बाजूला वस्तू व सेवा कर (जीएसटीपोटी) दोन हजार ५८२ कोटी अनुदान, मालमत्ता करातून एक हजार ५० कोटी, गुंतवणुकीवरील व्याज व इतर ११४ कोटी, पाणीपट्टी ९९ कोटी, स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) २०० काेटी, बांधकाम परवाना विभागातून ७०० कोटी, केंद्र, राज्य सरकारच्या अनुदानातून ३४२ काेटी, भांडवली जमेतून एक हजार ३१ काेटी ७७ लाख आणि इतर विभागांतून ३३२ काेटी रुपये जमा होतील असे अपेक्षित धरण्यात आले आहे. तर, खर्चाच्या बाजूला सामान्य प्रशासन विभागावर एक हजार ८६६ कोटी ७७ लाख, नियोजन व नियमन १५२ कोटी ६४ लाख, सार्वजनिक बांधकाम एक हजार ४९३ कोटी ८३ लाख, आरोग्य ४९६ कोटी ९८ लाख, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन ५५० कोटी पाच लाख, नागरी सुविधा ६४१ कोटी ४८ लाख, शहरी वनीकरण ३४२ कोटी ८९ लाख, शहरी गरिबी निर्मुलन व समाजकल्याण २२९ कोटी ३७ लाख, इतर सेवांसाठी ३४० कोटी ४८ लाख आणि महसुली खर्चासाठी १३६ कोटी ४६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांना ‘त्या’ प्रकरणावरून सुनावलं म्हणाले…
स्थापत्य विषयक कामासाठी एक हजार १५० कोटी, विद्युत कामांसाठी १३९ कोटी, पाणीपुरवठ्यासाठी ३०० कोटी, जलनि:सारण १०० कोटी, पर्यावरण १६० कोटी, मागासवर्गीय कल्याणकारी योजनांसाठी ५१ कोटी ६५ लाख, क्रीडासाठी ९० कोटी ९६ लाख, महिलांसाठी ८३ कोटी ३३ लाख, अपंगांसाठी ६२ कोटी नऊ लाख आणि भूसंपादनासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सिटी सेंटर (चिंचवड स्टेशन), कर्करोग रुग्णालय (थेरगाव), जुन्या तालेरा रुग्णालयात ३० खाटांचा जळीत कक्ष उभारणे, अण्णासाहेब मगर स्टेडियम (पिंपरी), राज्यघटना भवन (माेशी), वाकड येथील बॅडमिंटन काेर्ट, तळवडेतील जैवविविधता उद्यान, बहिणाबाई चाैधरी प्राणिसंग्रहालय, चार्जिंग स्थानके, दिव्यांग भवन, मुळा, पवना आणि इंद्रायणी नदी पुनरूज्जीवन या जुन्याच प्रकल्पांना पुन्हा नव्याने मुलामा दिला आहे. तर, औद्याेगिक प्रशिक्षण संस्था, भाेसरी, कासारवाडीत इंग्रजी माध्यमाची शाळा, वाकडमध्ये ‘सीबीएसई’ संलग्न शाळा, पिंपळे साैदागर येथे गिर्याराेहणासाठी क्लायबिंग वाॅल, निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर क्रीडा संकुल, ताथवडे, मामुर्डी आणि दापोडीतील सीएमई येथे सांडपाणी प्रक्रिया हे नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दुसरा मुक्काम आकुर्डीत असतो. येथे वारकरी भवन उभारण्याची वारकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार पांडुरंग काळभोर सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर वारकरी भवन उभारण्याची घोषणा गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात केली होती. मात्र, त्याबाबत कार्यवाही केलेली नाही. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केलेली नाही.