स्वमालकीच्या २२ एकरावर उभारले गोल्फ मैदान
विंग कमांडर बागमार यांच्याकडून विद्यार्थ्यांना मोफत शिकण्याची संधी

नाशिक : गोल्फ हा खेळ श्रीमंतांसाठी आहे, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र, विंग कमांडर प्रदीप बागमार यांनी निफाड येथे स्वतःच्या जागेत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत गोल्फ शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. कधी स्वप्नातही हा खेळ खेळायला मिळेल, असे या मुलांना वाटले नव्हते. मात्र, काही कालावधीतच फक्त टीव्ही आणि मोबाईलवर पाहिलेल्या गोल्फ खेळात शाळकरी मुले पारंगत झाली. तसेच, नागरिकांमध्येही या खेळाबद्दल आकर्षण निर्माण होत आहे. रोज नाशिक शहरातून जवळपास ४० हून अधिक नागरिक गोल्फ खेळण्यासाठी रिव्हर साइड गोल्फ कोर्स येथे जात आहेत.
निफाड-कुंदेवाडी रस्त्यावर विंग कमांडर प्रदीप बागमार यांची नदीलगत २२ एकर जमीन आहे. एक छंद म्हणून व गोल्फचा प्रसार व्हावा या उद्देशाने बागमार यांनी रिव्हर साईड गोल्फ क्लबची स्थापना केली. आजूबाजूच्या छोट्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी तेथे मोफत गोल्फ शिकवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्या मुलांना या खेळाबद्दल अजिबात माहिती नव्हती. क्रिकेट सोडला तर दुसरा कुठलाही खेळ ते खेळत नव्हते. मात्र हळूहळू त्यांच्यामध्ये या खेळाबद्दल आवड व आकर्षण निर्माण झाले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये ३६ ‘मिसिंग लिंक’
सरावानंतर पाचवी, सहावी, सातवीचे विद्यार्थी आता सराईतपणे गोल्फ खेळू लागले आहेत. या खेळामधून खेळ शिकणे, खेळणे व त्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळविण्याची संधी महाविद्यालयीन युवकांना याठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. गोल्फ खेळत असताना सहाय्यकाची आवश्यकता असते. त्यामुळे नाशिकमधून येणारे हौशी गोल्फ खेळाडू सहाय्यक म्हणून महाविद्यालयातील मुलांना प्राधान्य देतात व त्यामधून मुलांना आर्थिक उत्पन्नही मिळते, असे श्री. बागमार यांनी सांगितले.
गोल्फ श्रीमंतांचा खेळ असल्याचा गैरसमज मनातून काढून टाकावा. गोल्फ हा इतर खेळांपेक्षा वेगळा आहे. प्रत्येक खेळात आपण प्रतिस्पर्ध्याशी खेळत असतो. मात्र, गोल्फमध्ये आपण स्वतःशी खेळत असतो. स्वयंशिस्त, प्रामाणिकपणा, सातत्य आपल्यात निर्माण होते. नैसर्गिक सहवास लाभतो. लहान मुलांना शिकण्याच्या व त्यानंतर मोठे झाल्यावर उत्पन्न कमविण्याच्या संधीही आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
आम्हाला फक्त क्रिकेट खेळाबद्दलच अधिक माहिती होती. आता गोल्फ व्यवस्थित खेळता येत असल्यामुळे खेळाबद्दल अधिक आकर्षण निर्माण झाले.सर्वाधिक वेळ इतर खेळांपेक्षा गोल्फ साठी सध्या देत आहोत.
– ओम खराड, शालेय विद्यार्थी, स्वामी विवेकानंद विद्यालय, निफाड