पुणे जिल्ह्यात साडेचार लाख ‘फार्मर आयडी’ तयार

पुणे‘: अॅग्रीस्टॅक’ योजना राज्यभर लागू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकर्यांचे ‘फार्मर आयडी’ तयार करण्यात आले आहे, तर राज्यात 78 लाखांहून अधिक शेतकर्यांचे ’फार्मर आयडी’ तयार केले आहेत.
अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांने आघाडी घेतली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’द्वारे ‘फार्मर आयडी’ तयार करण्यापासून, ते बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकर्यांचा आधार क्रमांक, बँकेचे खाते क्रमांक आणि शेतीसह शेतीतील पिकांची माहिती एकत्रित असणार आहे.
‘अॅग्रीस्टॅक’ योजनेचे काम तलाठी तसेच कृषी सहायकावर सोपविण्यात आले होते. मात्र, त्यांनी योग्य मोबदला मिळत नसल्याचे सांगत कृषी सहायकांनी कामावर बहिष्कार घातला होता. त्यामुळे पुण्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये फार्मर आयडी तयार करण्याचे काम रखडले होते.
हेही वाचा – स्वारगेट प्रकरणानंतर एसटी प्रशासन खडबडून जागे; घेतला मोठा निर्णय, ‘त्या’ 72 बसेस मोडीत काढणार
पुणे जिल्ह्यात कृषी सहायकांनी फार्मर आयडी तयार करण्याचे पुन्हा सुरू करावे यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वारंवार कृषी विभागाच्या बैठका घेतल्या होत्या. जिल्हाधिकार्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ’फार्मर आयडी’ तयार करण्यास सुरुवात आले आहे.
पुणे जिल्ह्यात 14 लाख 53 हजार 297 इतक्या शेतकर्यांची नोंद आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख 49 हजार 525 इतक्या शेतकर्यांनी ‘फार्मर आयडी’ तयार केले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिली.
राज्यात आतापर्यंत 78 लाख 14 हजार 720 इतक्या शेतकर्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पाच लाख 14 हजार 921 तसेच नाशिक जिल्ह्यातून चार लाख 55 हजार 759 इतक्या शेतकर्यांनी आयडी तयार केल्याने अनुक्रमे पहिला, दुसर्या क्रमांकावर पोहोचले आहेत.