पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याची मागणी; नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभाराविरोधात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे राजकीय आणि व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिसाळ यांनी पत्रात बाजार समितीच्या गैरप्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त करत पुन्हा प्रशासक नेमण्याची मागणी केली.
पर्वती मतदारसंघात दाट लोकवस्तीत असलेल्या या बाजार समितीच्या कारभाराबाबत गेल्या काही महिन्यांपासून गंभीर तक्रारी येत आहेत. यापूर्वी तत्कालीन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी संचालक मंडळाच्या चौकशीचे आदेश दिले होते. व्यापाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी, अनधिकृत बांधकामे, झोपड्या, स्टॉल, होर्डिंग्ज आणि रस्त्यांवरील बेकायदेशीर विक्रेते यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बाजार समितीच्या परिसरात अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणि अनधिकृत स्टॉलमुळे पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे.
हेही वाचा – अपघातग्रस्त विमानात होते खासदार सुनील तटकरे यांचे नातेवाईक; तटकरे तातडीने अहमदाबादला रवाना
मिसाळ यांनी पत्रात नमूद केले की, पूर्वी प्रशासकाच्या नियंत्रणाखाली बाजार समितीचे कामकाज सुरळीत चालत होते. मात्र, संचालक मंडळ स्थापन झाल्यापासून परिस्थिती बिघडली. बाजार परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी, अपुऱ्या सुरक्षा रक्षकांचा दमदाटीचा व्यवहार आणि रस्त्यांवरील अतिक्रमण यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अवजड वाहने रस्त्यावर उभी केल्याने खासगी वाहनांना अडथळे येतात.
मिसाळ यांनी बाजार समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी केली असून, अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर तातडीने कारवाईचे निर्देश देण्याचे आवाहन केले. यामुळे बाजार समितीच्या कारभारावर आणि संचालक मंडळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.