अपघातग्रस्त विमानात होते खासदार सुनील तटकरे यांचे नातेवाईक; तटकरे तातडीने अहमदाबादला रवाना

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारी एअर इंडियाची फ्लाइट AI171 (बोइंग 787-8 ड्रीमलाइनर) गुरुवारी (12 जून) दुपारी 1:38 वाजता उड्डाणानंतर अवघ्या 5 मिनिटांत मेघानी नगर परिसरात कोसळली. या भीषण अपघातात सर्वच प्रवासी मृत्यू पावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विमानात 242 जण सवार होते, यात खासदार सुनील तटकरे यांच्या सख्या भाच्याची पत्नी अपर्णा महाडिक या क्रू मेंबर म्हणून उपस्थित होत्या.
विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. यापैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनडियन नागरिक होते. क्रू मेंबर्समध्ये कॅप्टन सुमीत सभरवाल, फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर, अपर्णा महाडिक, श्रद्धा धवन, दीपक पाठक, इरफान शेख, नंथेम सिंगसेन, मैथिली पाटील आणि मनीषा थापा यांचा समावेश होता. अपर्णा महाडिक या तटकरे यांचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत.
हेही वाचा – ‘आजही ऑफर कायम’, शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे वकत्व्य; राज ठाकरे – फडणवीस भेटीने चर्चांना उधाण
प्रत्यक्षदर्शींनुसार, विमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर्स हॉस्टेलच्या इमारतीवर आदळले, ज्यामुळे 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि परिसरात प्रचंड धूर आणि मलबा पसरला. फ्लायटरडार24 नुसार, विमान 625 फूट उंचीवर असताना त्याचा शेवटचा सिग्नल मिळाला. पायलटने मेडे कॉल दिला, परंतु विमानाला सावरण्यासाठी वेळ मिळाला नाही.
एनडीआरएफच्या सहा तुकड्या, बीएसएफ आणि दमकल विभाग घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला. अहमदाबाद पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांक 07925620359, तर एअर इंडियाने 18005691444 आणि नागरिक उड्डयन मंत्रालयाने 011-24610843, 9650391859 आणि 9974111327 हे क्रमांक जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी शोक व्यक्त केला. डीजीसीए आणि विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) यांनी तपास सुरू केला आहे.