Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जागा ताब्यात येताच महापालिकेने केले काम सुरू !

पुणे : कात्रज चौकातील ४० गुंठे जागा महापालिकेच्या ताब्यात येताच महापालिकेच्या पथ विभागाने बुधवारी सकाळपासूनच तेथे रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या दोन दिवसांत हे संपूर्ण काम पूर्ण करून डांबरीकरण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

कात्रज ते कोंढवा रस्त्यावरील कात्रज चौकात असलेली ४० गुंठे जमीन महापालिकेने रोख मोबदला देत रस्ता करण्यासाठी ताब्यात घेतली आहे. भूसंपादनाची आवश्यक ती प्रक्रिया पार पाडून संबंधित जागामालकाला जागेचा मोबदला देत ही जागा दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली. तब्बल २८ वर्षांनंतर ही जागा महापालिकेला मिळाली आहे. ही जागा महापालिकेच्या ताब्यात येताच बुधवारी पथ विभागाने येथे साफसफाईच्या कामाला सुरुवात केली.

पुढील काही दिवसांत जागेवर रस्ता तयार केला जाणार असून, डांबरीकरणदेखील पूर्ण करण्याचे नियोजन पथ विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यामुळे कात्रज चौकात होणारी वाहतूककोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. कात्रज चौकातील ही जागा संजय गुगळे यांच्या मालकीची होती. ही जागा ताब्यात घेण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका प्रयत्नशील होती. यापूर्वीच्या आयुक्तांनीदेखील त्यासाठी पाठपुरावा केला होता.

शहराच्या १९८७ च्या विकास आराखड्यानुसार (डीपी) ही जागा ३० मीटर डीपी रस्ता आणि ६ हजार २०० चौरस मीटर उद्यानासाठी बाधित होती. त्यानंतर २०१७ च्या विकास आराखड्यात हा रस्ता ३० ऐवजी ६० मीटरचा करण्यात आला. कात्रज-कोंढवा रस्ता आणि पुणे-सातारा रस्ता या दोन्हींमध्ये ही जागा बाधित होत होती. या जागेबाबत जागेचे मालक गुगळे हे उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांना मोबदला देण्याचा आदेश महापालिकेला दिला होता.

हेही वाचा –  विद्यार्थ्यांची मज्जा! मार्च, एप्रिल महिना सुट्ट्यांचा; जाणून घ्या कोणते आहेत दिवस?

न्यायालयाच्या आदेशानुसार २०१३ च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार, या जागेचे संपादन करून त्याचा मोबदला देण्याचे निश्चित करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होती. या जागेच्या संपादनासाठी पालिकेने रोख मोबदला म्हणून २१ कोटी ५७ लाख रुपये दिले आहेत. ही जागा ताब्यात आल्यानंतर बुधवारी महाशिवरात्रीची सुटी असतानाही महापालिकेने येथे कामाला सुरुवात केली आहे.

पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, कात्रज चौकातील जागा ताब्यात आल्यानंतर येथे साफसफाई केली जात आहे. दोन दिवसांत या जागेवरील साफसफाई पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर या जागेवर डांबरीकरण करण्यात येईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button