MahaShivratri 2025: हर हर महादेव..जयघोष करत चिंचवडे नगर येथे भक्तीमय वातावरणात महाशिवरात्री पर्व उत्साहात साजरे

पिंपरी-चिंचवड | महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. महाशिवरात्री पर्वाचे एक विशेष महत्त्व असून या काळात सर्व लोक शिवभक्तीमध्ये मग्न राहतात. त्याच वेळी, चिंचवड येथील भोलेश्वर मंदिरात चिंचवडे नगर येथे शिवरात्रीचा एक वेगळाच उत्साह दिसून आला. महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त वेदांताचार्य ह.भ.प विठ्ठल महाराज धोंडे आळंदी देवाची यांचे किर्तन संपन्न झाले.
महाशिवरात्री व २३ वा वर्धापन तसेच गजानन महाराज प्रगट दिनानिमित्ताने श्री भोलेश्वर प्रतिष्ठान व श्री ज्ञानेश्वरी सेवा समिती यांनी अखंड हरिनाम सप्ताह व किर्तन महोत्सवाचे सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शिवालिलामृत ग्रंथाचे पारायण देखील करण्यात आले.
हेही वाचा : ‘तेव्हा मी लोकप्रियतेत धोनीला मागे टाकेन’; प्रशांत किशोर यांचं विधान चर्चेत
‘हरी हरा भेद|नाही नका करू वाद.’, या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे अतिशय सुंदर निरूपण विठ्ठल महाराजांनी केले. ‘हरी हरा भेद|नाही नका करू वाद’ यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक असून भगवान विष्णू आणि शंभू महादेवामध्ये कोणताही फरक नाही दोघे एकचं आहेत. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचा भेद -भाव करू नये. ‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ’ भेदभाव करणे हे अमंगल आहे, असं वेदांताचार्य ह.भ.प विठ्ठल महाराज धोंडे यांनी सांगितले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निष्कपट चित्ताने निरामय शिवभक्ती करावी. तसेच शुध्द भावनेने परमार्थ करायला हवा, असा संदेशही विठ्ठल महाराजांनी किर्तनातून दिला.