breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

लोकसंवाद : प्रशासकीय मनमानीचे ‘पाटीलकी’अन् खासदार बारणेंचा ‘एक घाव दोन तुकडे’

मावळते आयुक्त राजेश पाटील यांच्या बदलीसाठी बारणेंचा दबाव

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
राज्यातील सत्ताबदलानंतर पिंपरी-चिंचवडच्या राजकीय पटलावरील समीकरणेही बदलली. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात मावळते आयुक्त राजेश पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी कारभार चालवला. प्रशासकीय मनमानी आणि राजकीय हस्तक्षेप पाटील यांना भोवला. त्यांनी भाजपासह शिवसेनेचाही रोष ओढावून घेतला. अखेर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आयुक्तांना तडकाफडकीच्या निर्णयाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, आयुक्तांच्या बदलीसाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘ताकद’ वापरले. ‘‘महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची कामे होत नाहीत’’, असे जाहीरपणे बंड पुकारण्याचे धाडस बारणे यांनी दाखवले होते. तसेच, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत बारणेंनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामध्ये झालेले दप्तर दिरंगाई बारणे यांना रुचली नाही. तसेच, आयुक्त पाटील यांनी खासदार बारणे यांचा फोन दोन-तीनदा घेतला नाही. बारणे आयुक्तांना एखाद्या मुद्यावर भेटायला गेले असता ‘पालकमंत्र्यांना विचारुन निर्णय घेवू’असे उत्तर मिळाले. त्यामुळे बारणेंची नाराजी आणखी वाढली होती. या नाराजीचा उद्रेक झाला आणि खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि साताऱ्यातील एका आमदार महोदयांच्या मदतीने आयुक्त पाटील यांच्या बदलीसाठी ‘फिल्डिंग’लावल्याचे बोलले जाते.
प्रशासकीय पातळीवर महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात ‘‘तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार बोले… आणि आयुक्त पाटील चाले…’’ अशी स्थिती होती. त्याला अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि जितेंद्र वाघ या दोन बड्या अधिकाऱ्यांची साथ मिळाली. महापालिकेतील पाटील, ढाकणे आणि वाघ असे ‘त्रिदेव’राजकीय हस्तक्षेपाला जुमानत नव्हते. अनेक वादग्रस्त निर्णय घेतल्यामुळे सर्वपक्षीय नाराजीचा सूर होता. राज्यातील सत्तेत महाविकास आघाडी असताना सर्व अलबेल राहिले. मात्र, शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर पाटील विरोधी असंतोषाचा उद्रेक झाला. त्यामुळे ‘‘आयुक्त बदली करा..’’ही मागणी जोर धरु लागली. तसेच, आयुक्त राजेश पाटील यांच्या बदलीनंतर आता अतिरिक्त आयुक्त ढाकणे आणि वाघ यांचाही ‘पत्ता कट होईल’ अशी चर्चा महापालिका वर्तुळात जोर धरु लागली आहे.
नवे आयुक्त दुपारी सूत्रे हाती घेणार…
नवनिर्वाचित आयुक्त शेखर सिंह आज सकाळी ११ वाजता आपल्या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. तत्पूर्वी आयुक्त सिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर भेट दिल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांची मुंबई भेट घेतली आहे. यावेळी पिंपरी-चिंचवडमधील विकासकामांबाबत ‘कॉम्प्रमाईज’ नको. शिवसेना खासदार आणि भाजपा आमदारांच्या सूचना विचारात घेवून काम करा… तक्रारी नको…अशा सूचक संदेश स्वत: फडणवीस यांनी दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे नवे आयुक्त सिंह यांना शिवसेना खासदार, भाजपा आमदार यांच्यासोबत जुळवून घेवून काम करावे लागणार आहे. तसेच, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याही सूचनांचे पालन करावे लागणार आहे. राजकीय रस्सीखेचमध्ये नव्या आयुक्तांना प्रशासकीय कसब दाखवावे लागेल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
राजेश पाटील यांची बदली रोखण्यासाठी भाजपाचे प्रयत्न?
दरम्यान, मावळते आयुक्त राजेश पाटील यांनी बदलीचा निर्णय आल्यानंतर भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्याकरवी बदली रोखण्याबाबत प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. तसेच, भाजपाचे माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके आणि काही माजी नगरसेवक यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाटील यांची बदली रोखण्याबाबत मागणी केली आहे. त्याबाबत काही प्रसारमाध्यमांमध्ये आयुक्त पाटील यांच्या बदलीचा निर्णय ‘होल्ड’ असे वृत्त प्रसिद्ध झाले. मात्र, राज्य सरकारकडून बदलीबाबत झालेला निर्णय किंवा आदेश रद्द करता येणार नाही किंवा योग्य ठरणार नाही, असा वरिष्ठ पातळीवरुन निरोप आहे. त्यामुळे पाटील यांची बदली रोखण्यासाठी भाजपासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे प्रयत्न कितपत यशस्वी होतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button