breaking-newsपुणेमहाराष्ट्र

सिंहगड मार्गाला पर्यायी रस्ता

डिसेंबरपासून वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता

सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पु. ल. देशपांडे उद्यान ते फन टाईम या साडेचार किलोमीटर लांबीच्या पर्यायी रस्त्याचे  काम पूर्णत्वास येत असून येत्या डिसेंबरपासून तो खुला होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सिंहगड रस्त्यावर वाहूक कोंडी होत होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी अंदाजपत्रकामध्ये उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता.

त्यासाठी सलग दोनवेळा अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली होती. चालू वर्षीच्या अंदाजपत्रकातही उड्डाणपुलाच्या कामासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीपैकी आठ कोटी रुपयांचा निधी सनसिटी-हिंगणे खुर्द या प्रभागातील विकासकामांसाठी वळविण्यात आला होता. त्यामुळे यंदाही उड्डाणपूल गुंडाळला जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र पर्यायी रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पर्यायी रस्ता व्हावा यासाठी स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी  पाठपुरावा केला होता. सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान ते फन टाईम चित्रपटगृह अशा साडेचार किलोमीटर लांबीच्या पर्यायी रस्त्याचे काम वेगात सुरु झाले आहे. हा विकास आराखडय़ातील रस्ता असून पहिल्या टप्प्यातील सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात फनटाईम ते विश्रांतीनगर पर्यंतचा तीन किलोमीटर लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. डिसेंबरनंतर हा पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

२५ कोटींचा खर्च

सिंहगड रस्त्यावर वाहतुकीची सातत्याने कोंडी होते. आनंदनगर, सनसिटी, धायरी, वडगाव या भागात जाण्यासाठी पर्यायी रस्ते नसल्यामुळे अंदाजपत्रकात उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. या उड्डाणपुलाचा आराखडा करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र दहा कोटी रुपयांचा निधी उड्डाणपुलासाठी लगेच खर्च होणार नव्हता. उलट सिंहगड रस्त्याला पर्यायी ठरणाऱ्या विकास आराखडय़ातील रस्त्याचे विकसन या निधीतून करण्यात आले. विकास आराखडय़ातील हा रस्ता हा सिंहगड रस्त्याला पर्यायी ठरणार असून त्यामुळे वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात सुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आतापर्यंत या कामासाठी पंचवीस कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

उड्डाणपुलापूर्वी पर्यायी रस्त्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. या रस्त्याचे काम वेगात सुरु असून डिसेंबपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.     – मंजूषा नागपुरे, स्थानिक नगरसेविका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button