यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण? ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर नितेश राणेंची खोचक टीका

मुंबई : मुंबईतील वरळी डोम येथे आज एक न भूतो न भविष्यती असा भव्य सोहळा पार पडला, जिथे तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. मराठी भाषेच्या रक्षणासाठी आयोजित विजयी जल्लोष मेळाव्यात केवळ ठाकरे बंधूंनीच नव्हे, तर त्यांच्या पुढच्या पिढीतील आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनीही एकत्र येऊन उपस्थितांचं मन जिंकलं.
असं असतानाच भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी या मेळाव्यावर खोचक टीका केली आहे. “दोन ठाकरे एकत्र आले, ही चांगली गोष्ट, पण यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण? हे शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी सांगावं,” असा टोमणा नितेश राणे यांनी मारला.
नितेश राणे यांनी या मेळाव्याला “जिहादी सभा” संबोधत ठाकरे बंधूंवर टीकास्त्र सोडलं. “या स्टेजवर समाजवादी नेते, कॉम्रेड दिसले. आता फक्त सीमीच्या दहशतवाद्यांशी युती करायची बाकी आहे,” असं खरमरीत टीकास्त्र त्यांनी डागलं. त्यांनी पुढे असा दावा केला की, ठाकरे बंधूंचा हा मेळावा मराठी भाषेच्या मुद्द्यापेक्षा राजकीय स्वार्थासाठी आहे. “हिंदू विरोधी आणि देशद्रोही लोकांना या मेळाव्यामुळे सर्वात जास्त आनंद झाला असेल,” असं राणे म्हणाले.
नितेश राणे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचं वर्चस्व राहील, असा विश्वास व्यक्त केला. “नऊ महिन्यांपूर्वीच लोकांनी महायुतीला कौल दिला आहे. मुंबईतील हिंदू समाज आता ठाकरेंना घरी बसवेल,” असं ते म्हणाले. तसेच, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले, “मोदी ज्या शाळेत शिकले, तिथे शिकण्याची ठाकरेंची लायकी नाही.
हेही वाचा – ‘आमच्या उठावाने आडवे झाले ते आता उठण्यासाठी..’; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
नितेश राणे यांच्यासोबतच अन्य भाजप नेत्यांनीही ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर टीका केली. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी या मेळाव्याला “भाषेच्या प्रेमाचं नाटक” संबोधत, “हा मेळावा निवडणुकीसाठी आणि मुंबईची लूटमार करण्यासाठी आहे,” असा आरोप केला. तर, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंबद्दलचं प्रेम “पुतणा-मावशीचं प्रेम” असल्याची टीका केली. “सत्ता गमावल्याचं वैषम्य उद्धव ठाकरेंच्या भाषणात दिसलं. हा इव्हेंट म्हणजे राजकीय पेरणीचा प्रयत्न आहे,” असं दरेकर म्हणाले.
दरम्यान, मराठी भाषेच्या रक्षणासाठी आयोजित विजयी जल्लोष मेळाव्यात केवळ ठाकरे बंधूंनीच नव्हे, तर त्यांच्या पुढच्या पिढीतील आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनीही एकत्र येऊन उपस्थितांचं मन जिंकलं.
या ऐतिहासिक क्षणाला खऱ्या अर्थाने साकारण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मोलाची भूमिका बजावली, ज्यांनी ‘आत्याबाई’ बनून ठाकरे कुटुंबीयांना एकत्र आणलं.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना एकत्र आणत ठाकरे कुटुंबीयांची एकी दाखवली. या मेळाव्याने शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना बळ दिलं आहे.