उद्धव-राज ठाकरेंचे मनोमीलन होणार ?
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण, दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते पूर्णपणे अनुकूल..

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे यांची शिवसेना (उबाठा गट) आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे एकत्रीकरण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने दोन्ही बाजूंकडून सकारात्मक पावले टाकली जात आहेत. असे घडले तर तो राजकारणातील एक ‘मैलाचा दगड’ ठरेल.
उद्धव गटाचा हिरवा कंदील..
ठाकरे बंधू एकत्र येतील का नाही? याबाबत गेले काही महिने नुसत्या चर्चा होत होत्या आणि दोघांमध्ये काहीही संवाद नव्हता, फक्त सोशल मीडिया आणि त्यांच्यातील तिसरी-चौथी फळी या चर्चा घडवून आणत होते. आता मात्र, एकत्र येण्यास उद्धव ठाकरे यांच्या गटाने होकार दिला असून राज ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे अवघ्या राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
पुढील पिढी सकारात्मक..
उद्धव यांचे चिरंजीव आदित्य आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित हे दोघेही राजकारणात सक्रिय असून त्यांच्या मतांना मोठा मान देखील आहे. अमित ठाकरे यांनी सांगून टाकले की दोन्ही भावांकडे मोबाईल आहे, त्यामुळे ते कोणत्याही क्षणी एकमेकांशी बोलू शकतात आणि दोन्ही पक्षांचे, विशेषतः ठाकरे घराण्याचे भवितव्य ठरवू शकतात. दोघांच्या मनोमीलनाची चर्चा कोणी सोशल मीडियावर करू नये, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लावला आहे.
दोन्हीकडील प्रवक्त्यांची लुडबूड नको..
दरम्यान, उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत किंवा सुषमा अंधारे तसेच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी या एकत्रीकरणाबाबत काहीही मते व्यक्त करू नयेत, असा सज्जड दम ठाकरे बंधूंनी त्यांना भरलेला असल्यामुळे इतर नेत्यांमध्येच फक्त चर्चा सुरू आहे.
हेही वाचा – बंगळुरूचे पोलिस आयुक्त, ACP-DCP अन् हवालदारपर्यंत सगळेच निलंबित, RCB विरोधात गुन्हा, मुख्यमंत्र्यांची घोषणा
दोन्ही बाजूचे उत्साही कार्यकर्ते एकत्र..
दोन्ही पक्षांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये जुळवून घेतल्याचे चित्र आहे. उबाठा गट आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच तिकडे नाशकात दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलनही झाल्याचे दिसून आले. तेथे मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला उद्धव यांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावल्याचे दिसले. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशींसह अनेक पदाधिकारी मनसे कार्यालयात उपस्थित राहिले. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवलीनंतर आता नाशकातही दोन्ही ठाकेरेंचे कार्यकर्ते मनाने एकत्र आले आहेत, असे मानायला हरकत नाही.
दोन्ही गटांकडून फलकाद्वारे संदेश..
नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एक फोटोही आणला होता. त्यामध्ये ‘हिंदुत्व आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र’ असा उल्लेख केला होता. या फोटोवर उद्धव आणि राज ठाकरेंचा फोटो लावण्यात आला होता. दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाचा संदेश देणारा हा फलक विशेष लक्ष वेधून घेत होता. काही ठिकाणी उद्धव, राज यांच्या खांद्यावर हात ठेवलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे फलकही लावण्यात आले आहेत.
भाजपाकडून हिंदुत्वाचा अपमान..
भारतीय जनता पार्टीने हिंदुत्व, हिंदुत्व करत हिंदुत्वाचा अपमान केला असल्याचा आरोप यावेळी नाशिकच्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येणे ही महाराष्ट्राची गरज असल्याचे मतही या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. मराठी माणसाच्या हितासाठी या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे, हीच सर्वसामान्य माणसाची आणि कार्यकर्त्याची भावना असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
अमित ठाकरेंचा महत्त्वाचा सल्ला..
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? दोन्ही पक्षाच्या अनेक नेत्यांनी तसे संकेतही दिलेत. अशातच आता ज्युनियर ठाकरेंही, संभाव्य ‘युती’ वर व्यक्त होऊ लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरेंनीही, एकत्र येण्यावर काहीच हरकत नसल्याचे सूचक वक्तव्य केले. त्यांनी या आधी मनसेकडून दोनवेळा तसा प्रयत्न झाल्याची आठवण करून दिली. आता दोन्ही नेत्यांची इच्छा असेल तर एकमेकांना फोन करावा, असा सल्ला त्यांनी दिला. त्यामुळे उत्सुकता लागून असलेल्या ठाकरे बंधुंचा, युतीबाबतचा अंतिम निर्णय काय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसऱ्या क्रमांकाच्या फळीत उत्साह!
ठाकरे बंधू एकत्र येणार या कल्पनेने दोन्ही पक्षातील दुसरी फळी मात्र चांगलीच आनंदी झाली आहे. महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण यामुळे फिरेल आणि ‘ठाकरे ब्रँड’ म्हणजे काय हे महाराष्ट्र अनुभवेल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. मुंबई महानगरपालिका दोघे एकत्र आले तरच ते जिंकू शकतात, असा सर्व्हे आल्यामुळे दोघांच्या एकत्रीकरणाला आता चालना मिळाली आहे.
इतरांची पोपटपंची : ठाकरे बंधू गप्पच !
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यावर इतरांनीच पतंग उडविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात, दोन्ही ठाकरे बंधू मात्र गप्पच आहे त्यांच्याकडून कोणतेही स्पष्ट अनुकूल उद्गार आले नाहीत. यामध्ये आता महत्त्वाची भूमिका आहे ती राज ठाकरे यांची ! कारण, गेल्या काही दिवसात त्यांना ‘महायुती’चे अनेक नेते भेटून गेले असल्यामुळे आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्या असल्यामुळे त्यांचा कल हा ‘महायुती’ कडे तर नाही ना? असा एक सूर राजकीय विश्लेषकांकडून येत आहे.