‘ऑपरेशन सिंदूर’ चं प्रत्यक्ष प्लॅनिंग, अभ्यास आणि लष्करी कारवाई !

काश्मीरमधील पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात संपूर्ण देश भावनिक झाला आणि २७ निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला तसेच दहशतवाद्यांना कायमचा धडा शिकवण्याची भाषा प्रत्येक भारतीय करू लागला!
पाकडयांना कायमचं ठेचण्याची भाषा..
केवळ दहशतवाद्यांनाच नव्हे तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकडयांनाही कायमचंच ठेचून काढा, अशी भावना प्रत्येक भारतीयाने बोलून दाखवली. उठसूठ भारतामध्ये हिंसाचार घडवायचा, आम्ही इशारे द्यायचे, ही युद्धनीती आता बास झाली, असे म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली ! हे सर्व घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानच्या घरात घुसून त्यांना धडा शिकवण्याचे नियोजन करीत होते, त्यामुळे तमाम भारतीयांची मानसिकता अतिउच्च थराला जाऊन बसली होती, हे आधी लक्षात घेऊ या !
जनरल अनिल चव्हाण यांचा ‘आँखो देखा हाल’ ?
भारताच्या या कारवाईबाबत पुणे विद्यापीठात एक व्याख्यान आयोजित केले होते आणि प्रत्यक्षात कारवाई करणाऱ्या जनरल अनिल चौहान यांनी ‘आँखो देखा हाल’ मांडला. जनरल चौहान यांनी अत्यंत शांतपणे व्याख्यानाच्या विषयाचे अत्यंत मुद्देसूद विवेचन उपस्थित श्रोत्यांसमोर केले. त्यांच्या बोलण्यात कोठेही अनावश्यक अभिनिवेश नव्हता, पण त्यांच्या बोलण्यातून ‘आधी केले मग सांगितले’ ही भूमिका अधोरेखित झाली. पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील ज्येष्ठ राज्यकर्ते आणि लष्कर यांनी सर्व शक्यता अभ्यासल्या. कोणतीही लष्करी कारवाई करण्यापूर्वी अनेक गोष्टींचा अत्यंत बारकाईने अभ्यास करावा लागतो. यात शत्रूची क्षमता, मानसिकता, त्यांच्या महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती, त्या ठिकाणच्या सॅटेलाईट इमेजेस, त्यांना उपलब्ध असलेल्या संरक्षण सामग्रीची परिणामकारकता,
आघात करण्यासाठी आपल्याकडे असलेले वेगवेगळे पर्याय, प्रत्यक्ष कारवाई जिथे करायची त्या ठिकाणांचे अचूक स्थान, कारवाईस लागणारा वेळ, आघाताचे लक्ष्यावर होणारे परिणाम, अशा कारवाई नंतर स्वाभाविकपणे शत्रू करू शकेल अशा प्रतिकाराचे स्वरूप आणि व्याप्ती, ते हल्ले परतवून लावण्याची आपली क्षमता, या युद्धजन्य परिस्थितीचा कालावधी, त्यासाठी लागणारी साधने, होणारा खर्च, संरक्षण सामग्री आणि मनुष्यहानी सारख्या संभाव्य नुकसानीचा अंदाज, ते नुकसान अत्यल्प असावे, यासाठी घ्यावी लागणारी काळजी, अशी लष्करी कारवाईची संपूर्ण प्रक्रिया त्यांनी सामान्य मनुष्याला समजेल इतकी सोपी करून सांगितली.
हेही वाचा – बंगळुरूचे पोलिस आयुक्त, ACP-DCP अन् हवालदारपर्यंत सगळेच निलंबित, RCB विरोधात गुन्हा, मुख्यमंत्र्यांची घोषणा
प्रत्यक्ष युद्धात उतरण्यापूर्वी..
पुढे ते म्हणाले, की मनुष्य पाच संवेदना अनुभवतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. पण, युद्धतंत्रात या पलीकडे असलेल्या भूमीची कंपने, चुंबकीय लहरी, विद्युत् चुंबकीय लहरी, आण्विक ऊर्जेच्या प्रसारणाची तीव्रता, वातावरणातील बदल, अनेक प्रकारच्या उपग्रह प्रतिमांचे विश्लेषण हे सारे करावे लागते.
शत्रूच्या प्रदेशातील मीडिया आणि सोशल मीडियातून उपलब्ध होणाऱ्या प्रचंड माहितीचे अचूक विश्लेषण, अशा अनेक क्षमतांचा एकत्रित उपयोग करून प्रत्यक्ष कारवाई करणाऱ्या तीनही लष्करी दलांना एकाचवेळी ही माहिती नेमकेपणाने पुरवणे आणि त्यांच्या संयुक्त कारवाईत उत्कृष्ट समन्वय ठेवणे, हे साधले की आपले कमीतकमी नुकसान होते आणि शत्रू प्रदेशात खूप मोठा विध्वंस घडवता येतो.
भारताने काय काय काळजी घेतली ?
भारताने ही सर्व काळजी घेऊन त्या रात्री १.०५ मिनिटांनी सुरू केलेली पहिली लष्करी कारवाई १.३० वाजता संपवली. यानंतर आंतरराष्ट्रीय राजशिष्टाचाराचा भाग म्हणून भारताच्या ‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स’ यांनी पाकिस्तानी समपदस्थाला असे हल्ले केल्याची औपचारिक माहिती दिली आणि असेही बजावले, की भारताने फक्त दहशतवाद्यांचेअड्डे नष्ट केले आहेत. एकाही लष्करी किंवा नागरी वसाहतीला याची झळ पोहोचली नाही, पाकिस्तानने यावर काही लष्करी साहस करून भारतावर हल्ले केले, तर त्याचे भारत अकल्पनीय उत्तर देईल, असेही भारताने ठणकावले.
पाकिस्तानचे हल्ले निष्प्रभ..
यानंतर पाकिस्तानने शेकडो हल्ले केले, जे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने निष्प्रभ केले.
याचे उत्तर म्हणून नंतर भारताने पाकिस्तानचे विमानतळ नष्ट करणारे जे भयंकर आणि भयावह हल्ले अत्यंत अचूकतेने केले, त्यात पाकिस्तानची जी हानी झाली, त्याचा तात्काळ परिणाम म्हणून त्यांच्या ‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स’ ने लगेच फोन करीत आपल्या समपदस्थांना युद्धविरामाची विनंती केली, असेही जनरल चौहान यांनी नमूद केले.
युद्धविरामाची दोन कारणे..
पुढे जनरल अनिल चौहान म्हणाले, की या विनंतीची दोन कारणे दिसतात. पहिले हे, की युद्ध आणखी काही काळ सुरू ठेवले, तर अपरिमित हानी होईल, हा अंदाज त्यांना आला असावा आणि दुसरे हे, की त्यांनी केलेल्या असंख्य हल्ल्यांनी भारताचे खरोखरच काही नुकसान झाले, की नाही, हे त्यांना समजण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान त्यांच्याकडे नाही. भारताने अगोदरच पाकिस्तानला आपली भूमिका स्पष्ट शब्दात कळवली होती, त्याप्रमाणे, भारताचा उद्देश पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांची सर्व केंद्रे दहशतवाद्यांसह नष्ट करणे, हाच होता आणि भविष्यातही राहील.
यापुढे पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी किंवा पाकिस्तानी लष्कराने काही कुरापत काढली, तर आम्ही पाकिस्तानच्या भूमीवर कुठेही भयंकर हल्ले करू शकतो, हे त्यांना दाखवून दिले होते. जनरल चौहान यांच्या या अवघ्या अर्ध्या तासाच्या व्याख्यानाने श्रोत्यांच्या मनातील सर्व संदेह धुके विरावे, तसे नाहीसे झाले होते.
‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेले नाही..
आपल्या छोट्याशा व्याख्यानात त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही, हे सांगताना आपले संपूर्ण लष्कर, आपल्या सर्व यंत्रणा चोवीस तास ‘हाय अॕलर्ट मोड’वर असून कोठेही यत्किंचितही गाफिल नाहीत याची नि:संदिग्ध ग्वाही दिली.
कोणताही देश लष्करी सामर्थ्य यासाठीच निर्माण करतो, ज्यामुळे आपल्या सीमांचे आणि आपल्या नागरिकांचे शत्रूपासून रक्षण करता यावे. यालाच आपल्या देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवणे म्हणतात. एक सामर्थ्यशाली राष्ट्रच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या प्रगतिशील राष्ट्र यामुळेच बनते.
युद्धच पण विविध आघाड्यांवर..
जनरल चौहान या व्याख्यानात असेही म्हणाले, की बदलत्या काळात युद्ध फक्त रणांगणावरच होत नाही, तर ते सायबर वॉर, मीडिया वॉर, सोशल मीडिया वॉर, इन्फार्मेशन अॕनालिसिस वॉर, इकॉनॉमिक वॉर, सायकॉलॉजीकल वॉर अशा अनेक पातळ्यांवर लढले जाते. समाज, राज्यकर्ते आणि लष्कर या तिन्हींचे मनोबल नेहमीच सर्वोत्तम राहील, यासाठी प्रत्येकाने शक्य ते सारे प्रयत्न आपले पवित्र राष्ट्रीय कर्तव्य म्हणून करावे, हा सारांश मनात घेऊन निर्भयतेने, संदेहरहित होऊन श्रोत्यांचे समाधान झाले.
आरोपांची राळ उडवणारे नेते..
सतत परस्पर विरोधी आरोप – प्रत्यारोपांची राळ उडवणारे उपद्रवी नेते ज्या समाजात असतात, अशा समाजाला वास्तवाचे भान समजावून सांगणाऱ्या एका अत्यंत प्रभावी सायकॉलॉजीकल कौंसेलरच्या भूमिकेत आपल्या आदरणीय जनरलना पाहणे, ऐकणे, अनुभवणे ही एक अत्यंत सुखद आणि असाधारण आत्मविश्वास जागा करणारी अनुभूति ठरली. भारताच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असणाऱ्या, प्राणांचेही मोल देताना न डगमगणा-या भारतमातेच्या या सर्व देशप्रेमींना कोटी कोटी प्रणाम ! खरोखर म्हणतात ना.. नरेंद्र मोदींच्या हातात संपूर्ण देश सुरक्षित आहे, हे त्यानिमित्ताने पटले !