Udayanraje Bhosale | सरकार काय बोळ्याने दूध पितं का? उदयनराजे भोसले भडकले

पुणे | पुणे जिल्ह्यात वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीस्थळी भापज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रासह राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी सध्याच्या राजकारण आणि महापुरूषांवरील वादग्रस्त वक्तव्यांवरून केंद्र अन् राज्यसरकारवर सडकून टीका करत खडेबोल सुनावले. तसेच सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन एक विशेष अधिवेशन बोलवावं आणि तात्काळ कायदा पारित करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.
उदयनराजे भोसले म्हणाले, की माझं असं म्हणणं आहे की जर त्यांनी विशेष अधिवेशन बोलावलं नाही तर याचा अर्थ असा होईल की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान व्हावा ही त्यांची सर्वांची इच्छा दिसते. मग लोकांनी यांना त्यांची जागा दाखवून द्यावी.
एक लक्षात घ्या, वारंवार किती वेळा सांगायचं? एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं. त्यांना सर्वांना कळायला हवं ना? ते काय बोळ्याने दूध पितात का? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान होतो तेव्हा त्यांना दिसत नाही का? दंगली होतात, अनेकांचे प्राण जातात. याला कारणीभूत कोण? जर तुम्ही कायदा पारित केला नाही तर हेच सर्व यासाठी जबाबदार आहेत, अशी टीका उदयनराजेंनी केली.
हेही वाचा : स्त्रीशक्तीचा जागर अन् मोशी येथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा!
वाघ्या, वाघ्या, कोण वाघ्या? येथे एकच वाघ होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. तसेच वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत एक इतिहासकारांची समिती नेमली पाहिजे. मग ती समाधी तिथे कधी आली? का आली? इतिहासात तर अशी नोंद नाही. काहीका असेना. पण त्या माध्यमातून योग्य तो निर्णय घ्यावा, असंही उदयनराजे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना तुम्ही आधारस्तंभ मानता ना? मग अजून त्यांचा शासन मान्य इतिहास प्रकाशित का झाला नाही? अनेक महापुरुषांचा शासन मान्य इतिहास मान्य झाला. पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनाच विसरलात? असं उदयनराजे म्हणाले. तसेच मराठ्यांच्या ज्या राजधान्या होत्या, राजगड असेल किंवा रायगड, सातारा, यासाठी एक शिव स्वराज्य सर्केट स्थापन केलं पाहिजे, अशी मागणी उदयनराजे यांनी केली.