शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कशा पद्धतीने होणार? उदय सामंत म्हणाले..

मुंबई | शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सादर करेल, आणि त्यानंतर अहवालातील शिफारशींचा अभ्यास करून ३० जून २०२६ पूर्वी सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत महत्वाचं विधान केलं आहे.
उदय सामंत म्हणाले, की शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कशा पद्धतीने होणार? याचाही आराखडा तयार झाला आहे. येत्या जूनपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा पद्धतीने करणार आहोत, याची यादी तयार होईल. शेतामध्ये असलेल्या भातापेक्षा शेतीमधून कापणी करून आणलेला भात, जो शेतकरी सुकवत होते, त्यावर पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामध्ये भाताचं नुकसान झालेलं असेल तर त्याबाबत भरपाई देण्यासाठी सर्व्हे करण्याच्या सूचना महाराष्ट्र सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत.
हेही वाचा : जेमिमाच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये मारली धडक
आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेच सांगायचं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकार चालवत असताना शेतकऱ्यांचं हित कशामध्ये आहे हे पाहिलं जातं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने दिलासा मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही सरकार चालवत आहोत आणि त्याची प्रचिती गुरुवारी आलेली आहे, असं उदय सामंत म्हणाले.
आता कर्जमाफी नेमकी कशा पद्धतीने होणार आहे? याचाही आराखडा तयार झालेला आहे. येत्या जूनपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा पद्धतीने करणार आहोत, याची देखील यादी तयार होईल, त्याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. सर्वात महत्वाचं हे आहे की ज्या पद्धतीने शब्द आपण देतो, तो शब्द पाळण्याची ताकद देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये आहे, हे पुन्हा एकदा कालच्या निर्णयाने महाराष्ट्राला या तीन नेत्यांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचेही आपण आभार व्यक्त केले पाहिजेत. विरोधक टीका करतात, पण महायुतीचं सरकार कामाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देत आहे, असं उदय सांमत यांनी म्हटलं आहे.
 
				 
 
 
 
 
 




