मेट्रो प्रकल्पातील बेफिकिरी; पाण्याने भरलेल्या खड्ड्यात विद्यार्थ्यांना धोका
निष्काळजीपणामुळे गंभीर दुर्घटनेची शक्यता
पिंपरी चिंचवड : भक्ती शक्ती उड्डाणपूलाजवळील श्रीकृष्ण मंदिर परिसरात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पातील निष्काळजीपणामुळे गंभीर दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. मेट्रोच्या लोखंडी पिलरच्या उभारणीसाठी येथे मोठा खड्डा खोदण्यात आला असून, त्या खड्ड्यात पाणी साचले आहे. विशेष म्हणजे, या खड्ड्याभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने शाळेतील काही विद्यार्थी या खड्ड्यात पोहण्याचा सराव करत असल्याचे दिसून आले, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
या धोकादायक परिस्थितीबाबत भाजप कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, संबंधित ठेकेदाराने सुरक्षा उपाययोजना न करता मोठा खड्डा उघडाच ठेवला आहे. त्यातच जवळील पाण्याची पाइपलाईन फुटल्याने पाणी वाया जात असून खड्डा सतत पाण्याने भरलेला राहतो.
हेही वाचा : पिंपळे सौदागरमध्ये रंगणार आशियाई क्लाइंबिंग चॅम्पियनशिप स्पर्धा
काळभोर यांनी आपल्या तक्रारीत मागणी केली आहे की, संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्यात यावी आणि दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत. तसेच खड्डा त्वरित बुजवून परिसर सुरक्षित करावा, जेणेकरून नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही.
महानगरपालिका प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे.




