जेमिमाच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये मारली धडक

IND W vs AUS W : भारताने महिला वनडे विश्वकप २०२५ च्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सनी पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयाची नायिका ठरली जेमिमा रोड्रिग्स. कठीण प्रसंगी मैदानात उतरलेल्या जेमिमाने संस्मरणीय शतक ठोकले आणि टीम इंडियाला विजय मिळवून देवूपर्यंत नाबाद राहिली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३३९ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४८.५ षटकांत ५ गडी गमावून ३४१ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला. यासह भारताने अनेक विक्रमही रचले.
या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचे श्रेय जेमिमा रॉड्रिग्जला जाते. ती एका महत्त्वाच्या वेळी आली आणि टीम इंडियासाठी एक संस्मरणीय शतक झळकावले. जेमिमाने १३४ चेंडूंचा सामना केला आणि नाबाद १२७ धावा केल्या. या खेळीसाठी जेमिमाला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही ८८ चेंडूत ८९ धावा केल्या. त्यापूर्वी स्मृती मंधानाने २४ चेंडूत २४ धावा केल्या. शेवटी रिचा घोषने तिचा दर्जा दाखवला. घोषने १६ चेंडूत २६ धावांची जलद खेळी केली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाची गोलंदाजांची कामगिरी विशेष प्रभावी नव्हती. कांगारूंकडून किम गर्थ आणि अॅनाबेल सदरलँड यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या, दोघींनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. गर्थने सात षटकांत ४६ धावा दिल्या, तर अॅनाबेल सदरलँडने १० षटकांत ६९ धावा दिल्या. उर्वरित गोलंदाजांना एकही विकेट घेण्यात यश आले नाही.
हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांना वाहिली श्रद्धांजली ; जनतेसोबत घेतली एकतेची शपथ
या सामन्यात प्रथण फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात उत्तम झाली होती, परंतु शेवटच्या टप्प्यात विकेट गमावल्याने अपेक्षेनुसार धावसंख्या उभारता आली नाही. तरीही कांगारू संघाने फोबी लिचफिल्डच्या शतकाच्या जोरावर सन्मानजनक धावसंख्या उभारली. युवा फलंदाज फोबी लिचफील्डने ११९ धावांची विस्फोटक शतकी खेळी साकारली. तिच्या या खेळीने ऑस्ट्रेलियाला मजबूत पाया मिळाला. याशिवाय एलिस पेरीने ७७ धावा तर एश्ले गार्डनरने ६३ धावांची अर्धशतकी खेळी करून संघाच्या धावफलकाला गती दिली. भारताकडून गोलंदाजी करताना श्री चरणी आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
या विजयासह, भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाला केवळ पराभूत केले नाही तर महिला विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणारा संघही बनला. यापूर्वी, कोणत्याही संघाने नॉकआउट सामन्यात २५० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठले नव्हते, परंतु भारताने ३३९ धावांचे मोठे लक्ष्य गाठले. हे विश्वचषक इतिहासातीलच नव्हे तर महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ठरला आहे. याआधी या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध ३३१ धावांचे लक्ष्य गाठून विक्रम प्रस्थापित केला होता. पण आता भारताने तो विक्रम मोडला आहे आणि नवा इतिहास रचला आहे.




