Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

To The Point: महाविकास आघाडीच्या ‘सोशल मीडिया टीम’ला आमदार महेश लांडगेंचा धसका? 

शहरात पाच वर्षांपूर्वी लावलेल्या फ्लेक्सवरुन ‘ट्रोल’ करण्याची वेळ : भोसरीसह पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची रणनिती फसली

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या इच्छुक उमेदवारांकडून जोरदार ‘ब्रँडिंग’ सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना सोशल मीडियावर ‘ट्रोल’ करण्यात येत आहे. त्यासाठी 2019 मध्ये मेट्रो भूमिपूजनासाठी लावलेल्या गुजराती फ्लेक्सचा आधार घेतला जात आहे. त्याद्वारे मराठी विरुद्ध गुजराती असा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले होते. त्यासंदर्भात जनजागृतीबाबत 2019 मध्ये आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात फ्लेक्स लावले. देशाच्या कानाकोपऱ्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येक जाती-धर्माचे नागरिक वास्तव्यास आहेत. माय मराठी बाबत अभिमान आणि सर्वच भाषिकांचा सन्मान या संकल्पनेतून मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड आदी भाषांमध्ये जाहिरात फलक लावले होते. यावरुन मराठी आणि गुजराती असा त्यावेळी अस्मितेचा विषय करीत आमदार लांडगे यांना ‘टार्गेट’ केले होते. आता त्याच फ्लेक्सचा आधार 2024 च्या निवडणुकीसाठी घेतला जात आहे. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड अशा तीनही मतदार संघांमध्ये आमदार महेश लांडगे यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. किंबहुना, पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील भाजपाची ‘स्ट्राँग लीडरशीप’ अशी आमदार लांडगे यांची ओळख आहे. त्यामुळे लांडगे यांना राजकीयदृष्टया ‘डॅमेज’ करण्याची संधी विरोधक सोडत नाहीत. 

निवडणुकीचा माहोल सुरू झाला. त्यावेळीच पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ हा जगातील सर्वांत उंच पुतळ्याचे राजकारण सुरू झाले. पुतळ्याच्या मोजडीला भेगा पडल्या आहे. अस्वच्छ जागेत पुतळ्याचे पार्ट ठेवले आहेत. ठेकेदार चुकीचा आहे. भ्रष्टाचार झाला आहे, असे अनेक आरोप करण्यात आले. मात्र, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबत तात्काळ खुलासा केला. ‘‘पुतळ्याचे काम ‘फॅब्रिकेशन स्टेज’ मध्ये आहे’’ अशी वस्तुस्थिती मांडली. तसेच, पुतळ्याचे काम करणारे जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांचा मुलगा शिल्पकार अनिल सुतार यांनीही पुतळ्याबाबत ‘फॅक्ट’ विषद केली. त्यामुळे विरोधकांच्या हातून हा मुद्दा निसटला. 

दोन दिवसांपूर्वी, पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या भारतातील पहिल्या संविधान भवनाच्या जाहिरातीवरुन पुन्हा विरोधकांनी सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उठवून बसवले. रिक्षा हुडवर लावलेल्या जनजागृती फलकावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रावर आमदार लांडगे यांनी स्वाक्षरी केली, असा FAKE NARRATIVE करण्याचा प्रयत्न झाला. वास्तविक, ती स्वाक्षरी नसून, नावाचा फाऊंट मुद्रीत झाला होता. असे असतानाही आमदार महेश लांडगे यांनी कार्यकर्त्यांनी लावलेल्या जाहिरातीमध्ये अनावधानाने झालेली चूक आहे, असे मान्य करीत माझ्यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करतो, अशी समंजसपणाची भूमिका घेतली. त्यातच संबंधित जनजागृती फलक काढून घ्यावेत, असे आवाहनही रिक्षा चालकांना केले. त्यामुळे विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले.

ग्राऊंडवर महेश लांडगे मजबूत, म्हणून मविआचा सोशल मीडिया ट्रायल… 

वास्तविक, महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या 10 वर्षांत विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे ग्राऊंडवर महेश लांडगे मजबूत आहेत. मोठा जनसंपर्क आणि विकासकामांच्या मुद्यांवर लांडगे यांना आव्हान देणे शक्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सोशल मीडियावर लांडगे यांना ‘टार्गेट’ करण्याची रणनिती आखली आहे. त्यासाठी विशिष्ट समाजसेवक आणि राजकीय व्यक्तींचा आधार घेतला जातो आहे. 2019 मध्ये लावलेल्या फ्लेक्सवरुन महाविकास आघाडीची सोशल मीडिया सध्या आमदार महेश लांडगे यांना ‘ट्रोल’ करीत आहे. पण, मराठीचा सन्मान आणि अन्य भाषांचा द्वेष… अशी भारतीयांची संस्कृती नाही. देशातील सर्व भाषिकांना भारताच्या समान नागरिकत्वाचा अधिकार आहे. मराठीसह अन्य भाषांमध्ये फ्लेक्स लावले, तर महेश लांडगे यांना ‘ट्रोल’ करणाऱ्या महाविकास आघाडीला गुजराती, मारवाडी, हिंदी, इंग्रजी भाषिक मतदारांची मते नको आहेत का? असा प्रश्न बहुभाषिक पिंपरी-चिंचवडकरांमधून उपस्थित केला जात आहे. महाविकास आघाडीच्या सोशल मीडिया टीम आणि विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेने महेश लांडगे यांचा प्रभावशाली प्रचार आणि सोशल मीडिया टीमचा धसका घेतला आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्यांवरुन निवडणूक भावनिक आणि राष्ट्रपुरूषांच्या नावाने FAKE NARRATIVE करण्याचा प्रयत्न केला जात असावा, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रचारासाठी कार्यरत फेसबूक पेजवरील पोस्ट
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button