पिंपरी-चिंचवडमध्ये RMC प्लॅट्स नियमावलीसाठी जनसुनावणी घ्या!
पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनची मागणी

मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्तांना निवेदन
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
शहर व उपनगरांमध्ये वाढत्या प्रमाणात सुरू असलेल्या रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लॅट्समुळे होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने कडक नियमावली (SOP) तयार करावी, तसेच सार्वजनिक जनसुनावणी आयोजित करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात शहरातील वाकड, पुनावळे, ताथवडे, किवळे आणि रावेत या झपाट्याने विकसित होणाऱ्या निवासी भागांमध्ये हवेतील धुळीचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, RMC प्लॅट्सच्या कार्यपद्धतीत स्पष्ट नियमावलीचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने कामकाज सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिक श्वसनाच्या आजारांनी त्रस्त होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा
गड-किल्ल्यांच्या नावांनी सजली पिंपरी-चिंचवडची नवी प्रशासन रचना!
या पार्श्वभूमीवर पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत—
1. सर्व RMC प्लॅट्सना पूर्णतः ‘डस्ट-फ्री टेक्नॉलॉजी’ बंधनकारक करणे
2. धुळीचे कण नियंत्रित करण्यासाठी सेडिमेंटरी चेंबर्स व आधुनिक फिल्टरेशन प्रणालीचा वापर
3. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन व नियमित ऑडिट
4. निवासी भागांपासून प्लॅट्ससाठी सुरक्षित अंतर निश्चित करणे
5. RMC टँकर वाहतुकीसाठी निश्चित वेळापत्रक व नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक दंड
6. नियमभंग करणाऱ्या प्लॅट्सवर परवाना रद्द किंवा सील करण्याची कारवाई
7. नागरिकांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा किंवा हेल्पलाइन सुरू करणे
या मुद्द्यांवर नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी सार्वजनिक जनसुनावणी घेण्यात यावी, अशी ठाम मागणीही करण्यात आली आहे. सर्व भागधारकांच्या सहभागातून पर्यावरणपूरक आणि पारदर्शक नियमावली तयार करावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या मागणीमुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील पर्यावरण व नागरी आरोग्य विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या RMC प्लॅट्समुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः वाकड, पुनावळे, ताथवडे, किवळे आणि रावेत या भागांमध्ये धुळीचे प्रदूषण चिंताजनकरीत्या वाढले आहे. या प्लॅट्ससाठी स्पष्ट आणि कडक SOP नसल्यामुळे मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे सर्व RMC प्लॅट्सना ‘डस्ट-फ्री टेक्नॉलॉजी’ बंधनकारक करणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि नागरिकांच्या सहभागातून पारदर्शक जनसुनावणी घेणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत.
– सचिन लोंढे, पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी फेडरेशन.





