‘औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही!’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहिल्यानगर : औद्योगिक क्षेत्रात झुंडशाही-गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्राची वेगाने वाढ होताना येथे काहीजण उद्योजकांना त्रास देण्याचे ‘उद्योग’ करत आहेत, अशी माहिती आपणाला मिळाली आहे. उद्योजकांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही. अशा घटकांना ठोकून काढू, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. लगेच त्यांनी ठोकून काढू म्हणजे कायद्याने ठोकून काढू अशीही पुस्ती जोडली.
अहिल्यानगर-पुणे रस्त्यावरील सुपा (ता. पारनेर) औद्योगिक क्षेत्रातील खाजगी प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज, रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार काशिनाथ दाते, आमदार बबनराव पाचपुते, हभप नामदेवशास्त्री, हभप महंत शिवाजी महाराज यावेळी उपस्थित होते.
नागरिकांना उद्योगांकडून त्रास होत असेल तर अधिकृत यंत्रणेकडे दाद मागा. मात्र त्यांना दिलेला त्रास खपवून घेतला जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्रात नवे उद्योग येत असताना येथे काही वाईट ‘उद्योग’ तयार झाले आहेत. काहीजण उद्योजकांना त्रास देत असल्याची माहिती मिळाली आहे. ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’, उत्पादन खर्च कमी व कायदा-सुव्यवस्था या आधारावर महाराष्ट्रात उद्योग वाढ होत आहे. मात्र अशा परिस्थितीत औद्योगिक क्षेत्रातील एखादी छोटी घटनाही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गांभीर्याने घेतली जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षकांना मी तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात उद्योग वाढताना पर्यावरणही जपायचे आहे. त्यामुळे उद्योग हे पर्यावरण पूरकच असायला हवेत. उद्योगवाढ व पर्यावरण एकत्र साधायचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – स्फोटके-ज्वलनशील पदार्थ वाहनांना ‘नो-एन्ट्री’
यापूर्वी उद्योग वाढ केवळ मुंबई-पुणे क्षेत्रातच होत होती. आता उद्योग वाढीचेही विकेंद्रीकरण सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. आत्मनिर्भर भारतासाठी ‘मेक इन इंडिया’ महत्त्वाचे आहे. त्या माध्यमातून आयातीला पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत. भारताची अर्थव्यवस्था वाढताना उत्पादन क्षेत्राचा त्याला मोठा हातभार लागणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, दावोसला गेल्यानंतर आम्ही काय करतो व आल्यानंतर काय होते हे सुपा औद्योगिक क्षेत्रातील ‘तौरल इंडिया’ या एक वर्षातच उत्पादन सुरू झालेल्या प्रकल्पाने विरोधकांना उत्तर दिले आहे, तेही एका मराठी उद्योजकानेच दिले आहे. ‘तौरल इंडिया’ या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते यांनी प्रकल्पाची माहिती देताना ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून १२०० जणांना रोजगार उपलब्ध झाल्याचे सांगितले.
दावोस गुंतवणूक परिषदेतून महाराष्ट्रात जी गुंतवणूक होणार आहे, त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, त्यातून ७५ हजार जणांना रोजगार मिळणार आहे. यापैकी नगर जिल्ह्यात १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे व १८ हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. दावोस परिषदेमध्ये प्रत्यक्षात जे करार होतात त्यापैकी ७५ टक्के करार मार्गी लागतात, केवळ २५ टक्के करार बदललेल्या भू-राजकीय परिस्थितीमुळे मार्गी लागू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण आहे. पुढील पाच वर्षात औद्योगिक वीजदर वाढणार नाही याची काळजी राज्य सरकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभेत बोलताना जाहीर केले.
तौरल इंडिया कंपनीचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते यांनी गेल्या वर्षी दावोस गुंतवणूक परिषदेमध्ये महाराष्ट्रात गुंतवणूक यावी म्हणून मोठे सहकार्य केले. यंदाही दावोस परिषदेमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळे ते महाराष्ट्राचे ‘औद्योगिक राजदूत’ म्हणून भूमिका बजावत आहेत, असेही कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले.




