दहावी-बारावी परीक्षांसाठी कडक कॉपीमुक्त अभियान; पिंपरी-चिंचवड पोलिसांचा विशेष बंदोबस्त

पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (राज्य मंडळ) यांच्या निर्देशानुसार दहावी व बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने परीक्षाकेंद्रांवर कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
राज्यभरात बारावीची परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून तर दहावीची परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत असून, परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील दहावीचे ७१ तर बारावीचे ४२ परीक्षा केंद्रांवर विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
हेही वाचा – ‘औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही!’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
परीक्षा केंद्रांच्या परिसरात १०० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींचा वावर, खाजगी शिकवणी वर्ग, सायबर कॅफे, झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, पी.सी.ओ. तसेच ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मोबाईल, ब्लूटूथ उपकरणे, इंटरनेट साधने किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करण्यावर कडक बंदी घालण्यात आली आहे.
परीक्षेदरम्यान भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कलम १६३ अन्वये आदेश लागू राहणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून आवश्यकतेनुसार व्हिडिओ चित्रीकरणही केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी मदत करणे, कॉपी पुरवणे किंवा परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करताना आढळल्यास संबंधितांवर Prevention of Malpractices Act 1982 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




