‘लाडकी बहीण योजनेतून ९ लाख लाभार्थी महिलांना वगळण्यात येणार’; प्रणिती शिंदेंचा आरोप

Praniti Shinde | लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर ४० ते ४५ हजार कोटींचा भार बजेटवर आल्याने फिस्कल स्पेस कमी झाली आहे. मात्र लाडकी बहीण योजना बंद करणार, ही योजना बंद करणार, ती योजना बंद करणार आम्ही कुठलीही योजना बंद केलेली नाही. ज्या योजना सुरु आहेत त्या चालवणारच आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान यावरून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी सरकारवर आरोप केला आहे.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, की महाराष्ट्राची तिजोरीच अडचणींत सापडली आहे. ९ लाख लाभार्थी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. हे होणार होतं हे माहीतच होतं. कारण लाडकी बहीण योजनेकडे पैसे वळवल्याने पी एम किसान योजना, संजय गांधी निराधार योजना या सगळ्या योजनांचे पैसे देणं बंद आहे. सरकारने एवढंही सांगितलं आहे एका योजनेचा लाभ घेत असाल तर दुसऱ्या योजनेचा लाभ देऊ शकणार नाही. या पातळीवर सरकारवर येऊन पोहचलं आहे. खरं तर ही एक शोकांतिका आहे.
हेही वाचा : रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना तातडीने मार्गी लावा; उपमुख्यमंत्री अजित पवार
लाडकी बहीण योजना म्हणजे एक आयवॉश वगैरे सारखी होती. EVM मुळे जिंकले आहेत पण लाडकी बहीण योजनेमुळे जिंकलो असं सांगितलं जातं आहे. त्यासाठीच ही योजना आणली गेली. तळागाळातले लोक अडचणींत आहेत. सत्तेत असणारे लोक सत्तेचा उपभोग घेत आहेत. सत्तेचा गैरवापर कसा करायचा याचं ज्वलंत उदाहरण महायुती सरकारच्या रुपाने दिसतं आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.