ई-रजिस्ट्रेशनद्वारे घरबसल्या दस्त नोंदणी

पुणे : राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने नवीन बांधकाम प्रकल्पातील सदनिका, अथवा दुकाने यांच्या खरेदी-विक्रीच्या दस्तनोंदणीसाठी इ-रजिस्ट्रेशन संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा वापर करण्याकडे बांधकाम व्यावसायिकांचा कल दिसून येत आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील सुमारे १०० पेक्षा अधिक बांधकाम प्रकल्पांमध्ये इ-रजिस्ट्रेशन सुविधेचा वापर करून दस्त नोंदणी होत आहे. या सुविधेमुळे बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातून ऑनलाइन प्रणालीद्वारे दस्त नोंदणी करता येते, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली.
नागरिकांना ऑनलाइन सुविधा देण्यात नोंदणी व मुद्रांक विभाग अग्रेसर आहे. मागील काही वर्षांपासून नोंदणी विभागाने संगणक प्रणालीचा वापर करून अधिकाधिक सुविधा नागरिकांना घरबसल्या कशा मिळतील, यावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून इ-रजिस्ट्रेशन या प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. ज्या बांधकाम प्रकल्पांना संबधित नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी, एनए तसेच रेराचे प्रमाणपत्र आहे, अशा विकसकांना इ-रजिस्ट्रेशन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जेणेकरून विकसकांना स्वत:च्या प्रकल्पातील सदनिका खरेदी-व्रिकीचे दस्त या सुविधोच्या माध्यमातून कार्यालयातूनच अपलोड करता येतील. ते मंजूर झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयातच रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करता येते.
हेही वाचा – मालमत्ताकर भरला, तरच मार्च महिन्याचे वेतन; ठेकेदारांनाही सक्ती
राज्यात पाचशे पेक्षा अधिक दुय्यम निंबधक कार्यालये आहे. राज्यात महिन्याला विविध प्रकारचे सरासरी दोन लाख दस्त नोंदविले जातात. मागील काही वर्षांपासून सदनिका खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नविन बांधकाम प्रकल्पांना या सुविधेचा फायदा होत आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मिळून २७ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. इ-रजिस्ट्रेशन सुविधेबाबत बांधकाम व्यावसायिकांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या सुविधेचा वापर करणाऱ्या प्रकल्पांची संख्या वाढत आहे. नागरिकांच्या सोयीच्या वेळेनुसार दस्त नोंदविता येत असल्याने त्यांना दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागत नाही, अशी माहिती हिंगाणे यांनी दिली.
ई-रजिस्ट्रेशन सुविधेची वैशिष्ट्ये
– ही सुविधा फक्त नवीन सदनिकांसाठीच (फर्स्ट सेल) आहे.
– सदनिका अथवा दुकाने यांची खरेदी-विक्री दस्त इ-रजिस्ट्रेशनद्वारे नोंदविणे शक्य.
– नागरिकांच्या वेळेनुसार दस्त नोंदविता येतो.
– दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी होण्यास मदत.
– ताटकळत उभे राहण्यापासून नागरिकांची सुटका.
– नागरिकांच्या वेळेची बचत.