विहामांडवा ग्रामपंचायतीचा विचित्र कारभार उघडकीस सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर गंभीर आरोप
विहामांडवा मुतारीच्या गेटसाठी ₹1. लाख सहा हजार खर्च; विविध कामांत अनियमिततेचे आरोप

विहामांडवा | पैठण तालुक्यातील विहामांडवा ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित करणारे अनेक प्रकार समोर येत आहेत. सार्वजनिक मुतारीच्या गेटसाठी तब्बल ₹1 लाख 6 हजार रुपये खर्च करण्यात आल्याची बाब उघड झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. साध्या गेटसाठी इतका मोठा खर्च करण्यात आल्यामुळे निधीच्या वापराबाबत शंका उपस्थित होत आहे.
याचबरोबर, गावात मागील काही वर्षांपासून नळाद्वारे येणारे पाणी निकृष्ट दर्जाचे असून त्याला दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून विविध आजारांचा धोका वाढला आहे.
स्वच्छतेच्या बाबतीतही गावाची परिस्थिती चिंताजनक आहे. कचरा संकलनासाठी नियमित घंटा गाडी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना कचरा विविध ठिकाणी टाकावा लागत आहे. त्यामुळे गावात अस्वच्छता वाढत असून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.
हेही वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अभिव्यक्ती’ कला महोत्सवाची सुरेल पर्वणी!
तसेच, गावात करण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामांमध्येही अनियमितता आढळून आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कामाचा दर्जा निकृष्ट असून काही ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
ग्रामस्थांच्या आरोपानुसार, या सर्व कामांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांची मिलीभगत असून विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक निधीचा गैरवापर करून काहींना आर्थिक लाभ मिळाल्याची चर्चा गावात सुरू आहे.
ग्रामस्थांनी या सर्व प्रकरणांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच गावात मूलभूत सुविधा तात्काळ सुधाराव्यात, अशीही मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, संबंधित प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसून, या प्रकरणाकडे प्रशासन कशा प्रकारे पाहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





