सतेज पाटील पुण्याचे काँग्रेस निरीक्षक

कोल्हापूर : पुणे शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही नियुक्ती केली आहे.
हेही वाचा – वरुणराजा यंदा शेतकऱ्यांवर कृपा करणार; यंदा पाऊस सरासरीच्या 103 टक्के बरसणार
पुणे जिल्ह्यात जाऊन तालुकाध्यक्ष, नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, तालुकानिहाय बैठका घ्याव्यात, जिल्ह्याच्या पक्ष प्रभारींना सोबत घेऊन संवाद साधावा, याबाबतचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा, असे पाटील यांना पाठविलेल्या नियुक्तिपत्रात म्हटले आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपचा वरचष्मा आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील काँग्रेसच्या नेमक्या स्थितीचा अहवाल देण्याची महत्त्वाची जबाबदारी आमदार पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.