ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अभिव्यक्ती’ कला महोत्सवाची सुरेल पर्वणी!

नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत दोन दिवस रंगणार सांस्कृतिक जल्लोष

महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहकार्य

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात कला, संस्कृती आणि सुरांची एक अविस्मरणीय पर्वणी रंगणार आहे. संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समितीच्या वतीने “अभिव्यक्ती – सृजनाच्या आनंदाची कला महोत्सव २०२६” हा भव्य सांस्कृतिक महोत्सव शनिवार व रविवार, दि. २५ व २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे ठिकाण ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे असून, रसिकांसाठी हा कार्यक्रम एक सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.

शनिवारी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत उद्घाटन समारंभ पार पडणार असून, मंदिर स्थापत्य विषयावर ओजस हिरानी यांचे व्याख्यान होणार आहे. यानंतर नृत्यपंढरी या सत्रात श्रद्धा हर्डीकर शिंदे यांचे कथक नृत्य सादर होईल. डॉ. पं. नंदकिशोर कपोते कथ्थक नृत्य तसेच पं. कैवल्यकुमार गुरव यांचे शास्त्रीय गायन रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे. दिवसाची सांगता ‘संपूर्ण वंदे मातरम्’ या देशभक्तीपर सादरीकरणाने होईल. संध्याकाळी रात्री ८ ते २ या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत डॉ. भावार्थ देखणे यांचे बहुरूपी भारूड सादर होणार आहे. त्यानंतर रंगमुद्रा थिएटर फाउंडेशन प्रस्तुत ‘आठवणींचा गाव’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडेल. ‘स्वरांजली – आशा भोसले विशेष’ या कार्यक्रमात सुरेल गाण्यांची मैफल रंगेल.

हेही वाचा 

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून घरपोच मालमत्ता कर बिल वाटपाला सुरुवात

रविवारच्या पुढील सत्रात पं. सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायन, डॉ. संध्या पुरेचा यांचे भरतनाट्यम नृत्य आणि पद्मश्री पं. रोणू मजुमदार यांचे बासरी वादन हे कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहेत. रात्री ‘त्या तिघी’ या सादरीकरणातून स्वातंत्र्यकुंडातील सावरकर घराण्यातील तीन वीरांगनांची गाथा उलगडली जाणार असून, शेवटी ‘संपूर्ण वंदे मातरम्’ने महोत्सवाची सांगता होईल. या महोत्सवाचे आयोजन आणि नियोजन लीना आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तसेच महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे सहकार्य लाभले आहे.

“परंपरा, प्रतिभा आणि सुरांचा सुरेल संगम” अशी ओळख असलेला हा महोत्सव पिंपरी-चिंचवडकरांसाठी कला, संस्कृती आणि सृजनाचा एक अनोखा उत्सव ठरणार आहे. विविध कलाप्रकार, दिग्गज कलाकार आणि सांस्कृतिक वारशाचा संगम अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

“पिंपरी-चिंचवड ही केवळ औद्योगिक नगरी नसून ती समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरेचीही भूमी आहे. ‘अभिव्यक्ती’सारखे महोत्सव आपल्या नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देतात आणि कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम शहराच्या सांस्कृतिक वैभवात निश्चितच भर घालणारा ठरेल.

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button