‘वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

मुंबई | महाविकास आघाडीने अधिकृत पत्रक जारी करून वंचितला मविआत सहभागी करून घेतल्याचं जाहीर केलं होतं. या पत्रकावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. परंतु, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही, असं वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, अद्याप वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. कारण वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यायचं असेल तर काँग्रेसच्या वरच्या नेतृत्वाने (दिल्लीतलं हायकमांड) मान्यता दिली पाहिजे. हायकमांडने तशी मान्यता दिली आहे की नाही, हे अद्याप आम्हाला माहिती नाही.
हेही वाचा – छगन भुजबळ यांचं मनोज जरांगे पाटलांना थेट आव्हान; म्हणाले..
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमच्याशी पत्रव्यवहार करतात. परंतु, वंचितच्या माविआतील समावेशाबाबतचा निर्णय काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात घेतील, असं आम्हाला समजलं आहे. ज्या पत्रकाबद्दल सध्या चर्चा चालू आहे त्यावर केवळ नाना पटोले यांची सही आहे. त्यावर थोरात आणि चव्हाण यांची सही नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मविआच्या बैठकीत सहभागी होणार का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, आम्हाला तिथे कशी वागणूक मिळाली याची आम्ही मोठी समस्या निर्माण करणार नाही. कारण आमचं आधीपासून एकच म्हणणं आहे की आपल्याला देशातून भाजपाचं धोकादायक सरकार उलथून टाकायचं आहे. भाजपाला विरोध म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. अशा परिस्थितीत आम्ही किंवा इतर कोणीही वैयक्तिक हेवेदावे चर्चेत आणू नये. ‘मी’पणा आणि भाजपा-आरएसएसचं सरकार उलथून टाकणं यापैकी एका गोष्टीला प्राथमिकता द्यायची असेल तर आम्ही भाजपा-आरएसएसचं सरकार उलथून टाकण्याला अधिक महत्त्व देऊ.





