Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

‘NEET’ पेपरफुटी प्रकरण: पुण्यातून महिला प्राध्यापक मनीषा मांढरेला सीबीआयकडून अटक

पुणे | देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET) प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातून आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि रसायनशास्त्राचा प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला अटक केल्यानंतर, आता पुण्यातूनच जीवशास्त्राच्या (Biology) वरिष्ठ प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिला सीबीआयने अटक केली आहे. प्रा. मांढरे या राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होत्या.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला शुक्रवारी पुण्यातून अटक करण्यात आली होती. कुलकर्णी हा परीक्षा प्रक्रियेशी थेट संबंधित होता. सीबीआयच्या पथकाने त्याची कसून चौकशी केली असता, या संपूर्ण गैरव्यवहारात प्राध्यापिका मनीषा मांढरे देखील सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर मांढरे यांची दिल्लीत चौकशी करण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा

पीसीयूमध्ये फिडेल सॉफ्टटेकद्वारे स्पॉगल एआय डेटा ॲनालिटिक्स लॅब

प्रा. मनीषा मांढरे या वरिष्ठ प्राध्यापिका असून परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने त्यांचा वनस्पतीशास्त्र (Botany) आणि प्राणीशास्त्र (Zoology) या विषयांच्या प्रश्नपत्रिकांशी थेट संबंध होता. यापूर्वी या प्रकरणात बिबवेवाडीतील ब्युटीपार्लरचालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली होती. तपासात समोर आले आहे की, वाघमारेने काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाच्या बहाण्याने तिच्या घरी बोलावले होते. त्या ठिकाणी प्रा. मांढरे यांनी विद्यार्थ्यांना थेट परीक्षेतील प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे सांगितली होती.

हा सर्व धक्कादायक प्रकार सीबीआयच्या तपासात उघडकीस आल्यानंतर प्रा. मांढरे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. पुण्यातून एकापाठोपाठ एक दोन मोठ्या प्राध्यापकांना अटक झाल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत, याचा शोध आता सीबीआय घेत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button