Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नदीचे पात्र कमी केल्यामुळेच पूर परिस्थिती; उपमुख्यमंत्री अजित पवार

पवना, मुळा, इंद्रायणीसह राज्यातील सर्व नद्यांची हीच परिस्थिती

चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

पवना, मुळा, इंद्रायणीसह राज्यातील सर्व नद्यांचे पात्र कमी केल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. प्रचंड नुकसान झाले असून यातून आता ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नदी सुधार प्रकल्प राबवताना नदीवरील पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या, नदी स्वच्छता, जलप्रवाहातील अडथळे दूर करण्यासह पूरस्थिती नियंत्रणाच्या दृष्टिने उपाययोजना राबवाव्यात, सर्व विभागांनी यापूर्वीसारखेच समन्वय ठेवून काम करावेत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी नदीवर राबवण्यात येणाऱ्या नदी सुधार प्रकल्पांबाबत आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), जलसंपदा विभाग, केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) अशा नदी सुधार प्रकल्पासंबंधित सर्व शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक आज पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य इमारतीतील कै. मधुकर पवळे सभागृह येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

बैठकीला राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम,पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला,पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता दिनकर गोजारे, वन विभागाचे प्रादेशिक उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुनाले, डॉ. हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता दि. म. डूबल, सीएमईचे कर्नल प्रभात सिंग, जलविज्ञान तज्ज्ञ अविनाश सर्वे, केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राचे संचालक श्री शैलम, शास्त्रज्ञ अनिलकुमार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा       :        सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या नावाने अध्यासन सुरू करणार 

पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका नदी सुधार प्रकल्प समन्वयाने राबवत आहेत. या अनुषंगाने महापालिकांनी पावसाळ्यात उद्भवणारी परिस्थिती पाहून योग्य निर्णय घ्यावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले ते पुढे म्हणाले, पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीसह अनेक नद्यांचे पात्र कमी केले जात आहे. यामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच पर्यावरण वाद्यांचा या नदी सुधार प्रकल्पांना विरोध आहे. मुळा आणि मुठा नदीच्या सुधारण्यासाठी पुण्याच्या बाजूचा ठेकेदार आणि पिंपरीच्या बाजूचा ठेकेदार वेगळा आहे. यामुळे समन्वयाचा अभाव आहे. याकडे महापालिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आत्ता राज्यातील अनेक नद्यांना पूर आला, प्रचंड नुकसान झालं. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. परतीच्या पावसाचे संकटही राज्यासमोर आहे त्यामुळे यातून योग्य तोडगा काढणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांचा रोष असल्याची पालकमंत्र्यांची कबुली

राज्यामध्ये विविध ठिकाणी सर्व मंत्र्यांनी दौरे केलेत. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेंव्हा घरदार उध्वस्त होतं, शेतीचं प्रचंड नुकसान होतं, जमीन वाहून जाते, तेंव्हा साहजिक अशा प्रतिक्रिया उमटतात. पण आम्ही या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, त्याअनुषंगाने निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना झालेल्या नुकसानीची माहिती दिलीये, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी केलेली आहे. यासाठी विविध विभागांची मदत लागणार आहे. सरकार याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय घेईल.

ओला दुष्काळ जाहीर करणार का?

मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून आम्ही सांगितलं आहे. शेतकऱ्यांना असं काही द्यावं लागणार आहे, जेणेकरून सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असं वाटायला हवं. दिवाळीपर्यंत बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन आहे.आत्ता तातडीची 5000 रुपये, अन्न-धान्य, कपडे, निवारा अशी मदत केली जातीये. कॅबिनेट बैठकीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करायचा का यावर नक्कीच चर्चा होईल.

पाऊस थांबल्यानंतर चाकणमधील रस्त्यांचे डांबरीकरण

पाऊस थांबल्यावर डांबरीकरणाचे काम सुरू होईल. तूर्तास चाकण परिसरातील अतिक्रमण हटवले जातायेत. आपल्याला जे साध्य करायचं आहे, ते पाऊस थांबल्यावर करता येईल. चालू पावसात जी कामं करता येतील तेवढी सध्या कामं करतोय.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button