पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार!
अमेरिका-रशिया वादाचा मोठा फटका : जागतिक तेल पुरवठ्यावर जबरदस्त परिणाम
नवी दिल्ली : संपूर्ण जगामध्ये अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती असून तणाव आहे. त्यामध्ये भारत-पाकिस्तान, इस्राईल-इराण, रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष आणि त्यामध्ये अमेरिकेचा होणारा हस्तक्षेप पाहता सध्या इंधन क्षेत्रात मोठा पेच निर्माण झाला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
अमेरिका-रशिया वादाचा फटका..
अमेरिकेने विविध देशांवर लावलेले कर, त्यांनी रशियाला दिलेले इशारे यामुळे सर्वच क्षेत्रात तणाव निर्माण झाला असून जागतिक तेल पुरवठ्यावर जबरदस्त परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे देशा-देशांतील तणावामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असून इंधन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते क्रूड ऑईलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तेलाच्या पुरवठ्यात अडथळे..
अनेक राजकीय घटना विचित्र पद्धतीने घडत असून रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत असल्याचे चित्र आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढल्याने तेलाच्या जागतिक पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. ऑईल मार्केट एक्सपर्टसनी ‘एएनआय’ शी संवाद साधताना स्पष्टपणे म्हटले आहे, की येत्या काही महिन्यांमध्ये ‘ब्रेंट क्रूड ऑईल’ च्या दरात वाढ होऊन ते ८० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात. भू-राजकीय जोखीम वाढल्याने तेलाच्या दरांवर दबाव वाढू शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इंधन क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे..
वेंचुरामधील ‘कमोडिटीज आणि सीआरएम’ चे प्रमुख एन. एस. रामास्वामी यांनी म्हटले आहे, की ब्रेंट ऑईलचे दर ऑक्टोबर दरम्यान ७२.०७ डॉलरवरुन ७६ डॉलर्स वर पोहचू शकतात. २०२५ च्या शेवटी हे दर ८०-८२ डॉलर्सपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे.
युद्ध थांबण्यासाठी मुदत..
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला युक्रेन सोबतचे युद्ध थांबवण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा वेळ दिला आहे. जर रशियाने युद्ध थांबवले नाही, तर रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिका अतिरिक्त निर्बंध लादणार असून शंभर टक्के दुय्यम टॅरिफ लादणार असल्याचा इशारा दिला आहे. हे उद्गार पाहता तज्ज्ञांच्या मते, त्यामुळे तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – “…म्हणून मंत्री बोर्डीकरांनी अधिकाऱ्याला कानाखाली वाजवण्याची धमकी दिली”, VIDEO शेअर करत रोहित पवारांची टीका
टॅरिफ विरोधात मोठा लढा..
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे रशियाकडून क्रूड ऑईल खरेदी करणाऱ्या देशांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. कमी दराने कच्चे तेल खरेदी करावे, अमेरिकेकडून लादल्या जाणाऱ्या मोठ्या दंडाचा आणि टॅरिफचा सामना करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ‘वेस्ट टेक्सास इंटरमिजीएट’ ने सप्टेंबरमध्ये क्रूड ऑईलचा दर ६९. ६५ डॉलर्स वरुन ७३ डॉलर्सपर्यंत पोहचू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
तेल बाजारात उलटफेर..
यावर्षी २०२५ च्या अखेरपर्यंत ७६-७९ डॉलर्स पर्यंत कच्च्या तेलाचे दर पोहचू शकतात. क्रूड ऑईलचे दर कमी झाल्यास ते ६५ डॉलर्सं पर्यंत येऊ शकतात. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या घडामोडींमुळे जागतिक तेल बाजारात उलटफेर होऊ शकतात. उत्पादन क्षमता कमी झाल्याने पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे २०२६ पर्यंत तेलाच्या किमती वाढू शकतात.
क्रूड ऑईल महागणारच..
या क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ञा नरेंद्र तनेजा यांनी ‘एएनआय’ सोबत बोलताना म्हटले आहे, की रशिया दररोज ग्लोबल ऑईल सप्लाय सिस्टीममध्ये ५० लाख बॅरल तेल निर्यात करतो. जर रशियातून बाहेर गेले, तर कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. क्रूड ऑईलचे दर प्रति बॅरल १०० ते १२० डॉलर प्रति बॅरल पेक्षा जास्त असू शकतात असा अंदाज वर्तवला आहे.
केंद्र सरकार फ्रंटफफूटवर..
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादल्याने आणि रशियाकडून तेल खरेदीस मज्जाव केल्याने तणाव वाढला आहे. भारताने तेल खरेदी थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. त्यानंतर आता मोदी सरकारने मोठे वक्तव्य केले आहे, आणि हा दावा फेटाळून लावला आहे.
सत्तर पेक्षा जास्त देशांना टॅरिफ..
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ कार्डने जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्यांनी ७०हून अधिक देशांना टॅरिफ लागू केला आहे. भारतावर सुद्धा तो लादण्यात आला. ट्रम्प यांनी भारत आणि रशियातील तेल व्यापारावर आक्षेप घेतला आहे. शस्त्र खरेदी करारावर नाराजी व्यक्त केली आहे. भारताने रशियाकडून इंधन खरेदी थांबवली, असा दावा त्यांनी केला.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले ?
ट्रम्प यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. मी असेच ऐकले आहे, हे खरे की खोटे याची मला माहिती नाही. पण, हे एक चांगले पाऊल आहे. आम्ही समोर काय होते, याकडे लक्ष ठेवून आहोत. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
भारताची भूमिका काय?
ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर सरकारकडून प्रतिक्रियेची अपेक्षा व्यक्त होत होती. खरेच भारताने रशियाकडून इंधन खरेदी थांबवली आहे का? तशी काही योजना आहे का? असे प्रश्न विचारण्यात येत होते. दरम्यान, सरकारी तेल खरेदी करणाऱ्या कंपन्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रशियाकडून तेल खरेदी न करण्यासंदर्भात कोणताही शासकीय आदेश आले नसल्याची प्रतिक्रिया कंपन्यांनी दिली. त्यामुळे अमेरिकेच्या दबावाखाली भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवणार नाही, असे तरी सध्या समोर येत आहे. भारत तेल खरेदी करणार नाही, अशा अफवांनी ट्रम्प हे खूश असल्याचे आता तरी समोर येत आहे. तर एक दिवसापूर्वी भारत आणि रशियात काय संबंध आहेत, याने आपल्याला काही फरक पडत नसल्याचे ते म्हटले होते.
इराणवर अमेरिकेचे निर्बंध..
भारतीय तेल कंपन्या इराण किंवा व्हेनेझुएला कडून खनिज तेल खरेदी करत नाहीत. कारण या देशांवर अमेरिकेकडून घातलेले निर्बंध आहेत. भारतीय तेल कंपन्या सातत्याने अमेरिकेकडून सुचवलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत आहेत. विशेषतः रशियन खनिज तेलाच्या बाबतीत, त्यांनी अमेरिकेने ठरवलेल्या ६० डॉलर्स प्रती बॅरल या किंमत मर्यादेचे या कंपन्यांनी पालन केले आहे.
महागाईचा आगडोंब उसळू शकतो..!
इंधन म्हणजेच डिझेल, पेट्रोल महागले तर साहजिकपणे सर्वच वस्तू महागण्याची शक्यता असते. इंधन महागल्यामुळे साहजिकच वाहतूक महागते, म्हणजेच अन्नधान्य, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची टंचाई होऊ शकते आणि दर वाढू शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घातलेल्या अटींपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काय मार्ग काढतात? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.





