सुपर-८ मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना २२ फेब्रुवारीला; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादमध्ये रंगणार लढत

T20 World Cup | आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने साखळी फेरीत दमदार कामगिरी करत सलग चार विजय मिळवले आहेत. बुधवारी नेदरलँड्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही भारताने विजय मिळवत विजयाचा चौकार पूर्ण केला आणि सुपर-८ फेरीत दिमाखात प्रवेश केला.
सुपर-८ फेरीत भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. गेल्या वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेल्या या दोन बलाढ्य संघांमध्ये पुन्हा एकदा सामना रंगणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीत अपराजित राहून सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचा : एसटीच्या ताफ्यात १०० ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ मिडी बस
भारतीय संघाने अमेरिका, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा पराभव करत पुढील फेरी गाठली. तर दक्षिण आफ्रिकेने कॅनडा, अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि यूएईला हरवत ग्रुप डी मधून सुपर-८ मध्ये स्थान निश्चित केले. दोन्ही संघ तगडे असल्याने अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. याआधी सराव सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर मात केली होती.
सुपर-८ फेरीतील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना २२ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल, तर नाणेफेक ६:३० वाजता होणार आहे. सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल, तर जिओ हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.




