PCMC: ‘मेट्रो’ला पुन्हा विलंब; अधिकाऱ्यांची बैठक घेणार!
भाजपा नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांनी लक्ष वेधले; महापौर रवि लांडगे यांचे आश्वासन, काम वेळेत पूर्ण करू!
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी: शहरातील महत्त्वाकांक्षी शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्पाच्या सततच्या विलंबामुळे आयटीएन्समध्ये नाराजी आहे. तसेच, पिंपरी ते निगडी मेट्रोचे कामही संथगतीने सुरू आहे. याबाबत भाजपा नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत लक्ष वेधले. यावर, संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवू आणि कामाला गती देवू, असे आश्वासन महापौर रवि लांडगे यांनी दिले आहे.
हिंजवडी आयटी परिसरातील हजारो नोकरदारांसाठी ही मेट्रो ‘जीवनवाहिनी’ ठरणार होती. मात्र, वारंवार बदलणाऱ्या तारखांमुळे हा प्रकल्प ‘तारखांचा खेळ’ बनल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ मे २०२६ पर्यंत मेट्रो सुरू करण्याचे निर्देश दिले होते. ही मुदत उलटूनही प्रकल्प पूर्ण न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापूर्वी मार्च २०२५, सप्टेंबर, डिसेंबर आणि मे २०२६ अशा अनेक वेळा अंतिम मुदती जाहीर करण्यात आल्या; मात्र त्या प्रत्येकवेळी फोल ठरल्या आहेत. आता १५ जून ही नवी तारीख देण्यात आली आहे.
हेही वाचा : पर्वतीत आजोबांकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न
दरमयान, या प्रकल्पात सहभागी असलेल्या Tata Group आणि Siemens सारख्या कंपन्यांवरही कामाच्या संथ गतीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. विलंबाची कारणे देताना प्रशासनाकडून कामगारांच्या अनुपस्थितीपासून ते आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे साहित्य तुटवड्यापर्यंत विविध कारणे सांगितली जात आहेत. मात्र, स्थानिक पातळीवरील साधी कामेही प्रलंबित असल्याने ही कारणे अपुरी आणि असमाधानकारक असल्याची टीका सभागृहात करण्यात आली. हिंजवडी परिसरातील खराब रस्ते आणि वाढती वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आले. रोजच्या ट्रॅफिकमुळे तरुणांमध्ये पाठीच्या व मणक्याच्या समस्या वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
नगरसेविका गव्हाणे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या प्रकल्पासंदर्भात तातडीने विशेष बैठक बोलावून १५ जूनपर्यंत किमान १२ टप्पे सुरू करण्याचे लेखी आश्वासन द्यावे, तसेच कालबद्ध कृती आराखडा सादर करावा, अशी मागणी केली. तसेच, यापुढे एकही दिवस मुदतवाढ दिली जाऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. या प्रकल्पातील विलंबामुळे लोकप्रतिनिधींनाही नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत असून, करदात्यांच्या पैशातून होणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता आणि वेळेचे पालन आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.
“शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो, पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्प हा पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील विलंब आता असह्य होत असून, तो ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस कृती आराखडा सादर करावा आणि कामाला गती द्यावी, हीच आमची स्पष्ट मागणी आहे,”
– प्रा. सोनाली गव्हाणे, नगरसेविका, भाजपा, पिंपरी-चिंचवड महापालिका.





