सांगोल्यात ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी; ‘त्या’ तिघांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Operation Lotus : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राबवलेले ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी ठरले असून, पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीच्या तोंडावर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटातील तीन पंचायत समिती सदस्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.
यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) दीर्घकाळीन वर्चस्वाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
मुंबई येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. जवळा गणातील पूनम इंगवले, घेरडी गणातील अशोक चोरमुले आणि अजनाळे गणातील बापू जावीर या तीन पंचायत समिती सदस्यांनी भाजपची सदस्यता स्वीकारली. या घडामोडीमुळे पंचायत समितीतील संख्याबळात महत्त्वाचा बदल झाला असून, भाजपने सभापतीपदासाठी आपला दावा अधिक मजबूत केला आहे.
हेही वाचा – ‘गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रात सुलभ व विश्वासार्ह व्यवस्था’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीस माजी आमदार शहाजीबापू पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, बाळासाहेब एरंडे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शिंदे उपस्थित होते. बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की, सांगोला पंचायत समितीच्या सभापतीपदाची पहिली संधी भारतीय जनता पक्षाला देण्यात येईल. त्यानंतर पुढील कालावधीत शिवसेनेला हे पद देण्याचा ठराव करण्यात आला. या रणनीतीनुसारच हे तीन सदस्य भाजपमध्ये दाखल झाले.
नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला (भाजप-शिवसेना) ५ जागा मिळाल्या होत्या, तर शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) ६ जागा मिळाल्या होत्या. मात्र, या तीन सदस्यांच्या प्रवेशामुळे शेकापचे बहुमत धोक्यात आले आहे. यामुळे सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या घडामोडींवर मोठी चर्चा रंगली आहे.
सांगोला पंचायत समितीवर गेल्या ५५ वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व कायम होते. या काळात शेकापव्यतिरिक्त कोणत्याही पक्षाचा सभापती झाला नव्हता. मात्र, सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे इतिहास घडण्याची शक्यता आहे. सांगोला पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा सभापती होऊ शकतो. जवळा गणातील सदस्या पूनम इंगवले यांचे नाव संभाव्य सभापती म्हणून चर्चेत आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कुशल रणनीतीमुळे सांगोला तालुक्यात महायुतीला मोठा राजकीय लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. ही घडामोड सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात नवे वळण घडवणारी ठरू शकते. सभापती निवडीपूर्वीच झालेल्या या उलथापालथीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे.





