जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार, हल्ला कॅमेऱ्यात कैद, संशयिताला अटक

Farooq Abdullah | जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना जम्मूमध्ये घडली आहे. जम्मूच्या ग्रेटर कैलाश परिसरात एका लग्नसमारंभात ही घटना घडली. सुदैवाने सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे गोळी त्यांना लागली नाही आणि ते थोडक्यात बचावले.
लग्नसमारंभात घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, फारूक अब्दुल्ला एका लग्नसमारंभासाठी ग्रेटर कैलाश परिसरात आले होते. मंडपातून जात असताना एका व्यक्तीने त्यांच्या पाठीमागून जवळून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा : ‘आगामी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
संशयिताला ताब्यात
या प्रकरणात पोलिसांनी कमल सिंह जामवाल या संशयिताला ताब्यात घेतले आहे. सुरक्षा रक्षकांनी त्याला घटनास्थळीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हल्लेखोराने जवळून पिस्तूल लावून गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सीसीटीव्हीत कैद झाला प्रकार
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून त्यात हल्लेखोर गर्दीतून पुढे येताना दिसतो. फारूक अब्दुल्ला पुढे चालत असताना त्याने पाठीमागून जवळून गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ प्रतिसाद दिल्याने गोळी त्यांना लागली नाही. हल्ला झाला त्या वेळी जम्मू-काश्मीरचे विद्यमान उपमुख्यमंत्री Surinder Choudhary देखील कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. तेही या घटनेतून सुरक्षित बचावले.
संशयिताची कबुली
पोलिसांच्या चौकशीत ६५ वर्षीय कमल सिंह जामवाल याने धक्कादायक कबुली दिली. गेल्या २० वर्षांपासून तो फारूक अब्दुल्ला यांच्या हत्येचा प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितले. “माझ्याकडील पिस्तूल माझेच आहे. त्यांची हत्या करण्याचा माझा उद्देश होता, पण ते सुदैवाने बचावले,” असे त्याने पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे.





