पुणे: मध्यरात्री ‘स्वे ऑल डे बार ‘ पबसमोर तुफान राडा! स्थानिकांचा उद्रेक, पब बंद करण्याची मागणी
मद्यधुंद ग्राहकाने रस्त्यावर बिअरच्या बाटल्या फोडत एका स्थानिक तरुणास केली मारहाण
मुंढवा, पुणे: पुण्यातील पब आणि बार संस्कृतीवरून पुन्हा एकदा वाद उद्भवला आहे. मुंढव्यातील ‘स्वे ऑल डे बार’ पबसमोर रविवार-सोमवारच्या मध्यरात्री तुफान राडा घडला. मद्यधुंद ग्राहकाने रस्त्यावर बिअरच्या बाटल्या फोडत एका स्थानिक तरुणास मारहाण केल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला. या घटनेमुळे त्रस्त स्थानिकांनी थेट रस्त्यावर उतरून पब बंद करण्याची जोरदार मागणी केली.
बार मध्ये काय घडलं नेमकं?
रविवारच्या रात्री ‘स्वे ऑल डे बार’ पबमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका ग्राहकाने रस्त्यावर बिअरच्या बाटल्या फोडल्या. एवढ्यावरच न थांबता, त्या तरुणाने एका स्थानिक व्यक्तीस शिवीगाळ करत मारहाण केली. यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी पब चालकाकडे या गैरप्रकाराबाबत जाब विचारला असता, पब मालकानेही मुजोरीची भूमिका घेत स्थानिकांनाच दमबाजी केली. त्यामुळे संतप्त स्थानिकांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत पब बंद पाडला.
बार बाबत स्थानिकांचा उद्रेक
या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेविका गौरी पिंगळे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिकांनी पबसमोर जोरदार आंदोलन करत, ‘स्वे ऑल डे बार’ कायमचा बंद करण्याची मागणी लावून धरली. पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत संतप्त जमावाने परिसरात तणाव निर्माण केला होता. मात्र पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत स्थानिकांना पबच्या गेटवर रोखलं, ज्यामुळे तोडफोड टळली.
पोलीस कारवाई
स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पब तात्पुरता रिकामा करून, हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.
नागरिकांची मागणी
स्थानिक नागरिकांनी ‘स्वे ऑल डे बार’ हा पब कायमचा बंद करण्याची आग्रही मागणी केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून बार आणि पबमधून मद्यधुंद व्यक्तींकडून त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी बाटल्या फोडणे, आवाजाचा त्रास, गैरवर्तन यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पुण्यातील वाढती बार आणि पब संस्कृती ही एक सामाजिक आणि कायदेशीर चिंतेचा विषय ठरत आहे. नियमभंग करणाऱ्या पब्सवर वेळेवर आणि कडक कारवाई झाली नाही तर अशा घटनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. स्थानिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलण्याची गरज आहे.





