Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

मस्साजोगात अश्विनी देशमुख यांचा पराभव, कारण काय?

भावनिक लाट फिकी ठरली; स्थानिक मुद्दे, संघटनशक्ती आणि स्वरूपानंद देशमुखांची मजबूत रणनीती ठरली निर्णायक विजयाची गुरुकिल्ली

मस्साजोग निंवडणुक रणधुमाळी : फक्त भावनेच्या आधारावर निवडणुका जिंकता येत नाहीत. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागेवर कुटुंबातीलच व्यक्ती निवडून येईल, असेही नेहमीच होईल याचीही शाश्वती नाही. या विषयाची चर्चा करण्याचे कारण ठरत आहे मस्साजोगच्या सरपंचपदाची निवडणूक. खरंतर देशातील चार प्रमुख राज्य, बारामती-राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक अशा महत्त्वाच्या निवडणुका असूनही पाच ते सहा हजार लोकसंख्या असेलल्या मस्साजोग सारख्या गावाची चर्चा राज्यपातळीवर होत आहे. याचे कारण म्हणजे दोन वर्षांपूर्वी निर्घृण हत्या झालेल्या संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा निवडणुकीतील पराभव…

माजी सरपंच संतोष देशमुख यांची ज्यापद्धतीने हत्या करण्यात आली, त्यावरून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. सर्व समाजाला घेऊन जाणारा, मनमिळावू, विकासाची दृष्टी असलेले संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सरपंचपदाची पोटनिवडणूक झाली. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक बिनविरोध घेण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र मागील निवडणुकीत संतोष देशमुख यांच्याकडून अवघ्या ९ मतांनी पराभूत झालेल्या स्वरूपानंद देशमुख यांनी पुन्हा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही लढत झाली.

मस्साजोगचा निकाल काय?

मस्साजोग ग्रामपंचायतीमध्ये सुमारे दोन हजार २,२०० मतदार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी एकूण १७४४ मतदान झाले असल्याचे सांगितले जाते. देशमुख यांच्या हत्येची पार्श्वभूमी आणि गावात दोन वर्षात घडलेल्या घडामोडींमुळे यंदा ८४ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. विजयी झालेल्या स्वरुपानंद देशमुख यांना ९१४ मते मिळाली असून अश्विनी देशमुख यांना ८२२ मते मिळाली आहेत. नोटाला ८ मते मिळाली. अवघ्या ९२ मतांनी स्वरुपानंद यांचा विजय झाला.

मस्साजोगच्या सरपंचपदाच्या निवडणुकीची चर्चा का?

मस्साजोग हे गाव डिसेंबर २०२४ मध्ये राज्यात चर्चेचा विषय ठरले. गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. ९ डिसेंबर रोजी हत्या झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांत वातावरण तापू लागले. गावपातळीवर आंदोलन झाले. या गुन्ह्यामुळे जिल्ह्यातील दोन प्रमुख गट एकमेकांसमोर आले, त्यामुळे हा विषय राज्यपातळीवर पोहोचला. देशमुख यांचे मारेकरी हे तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळच्या वर्तुळातील असल्याचा आरोप विरोधकांनी केला. नुकतेच मंत्रीपद प्राप्त झालेले धनंजय मुंडे यामुळे अडचणीत आले, पुढे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला.

हेही वाचा : ‘म्हाडा’च्या अर्जातील पडताळणीवेळी शहरातील अर्जदारांचा उडतोय गोंधळ

२०२४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून राज्यात चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन आणि संतोष देशमुख यांची हत्या, या दोन विषयांची पुढे सरमिसळ झालेली राज्याने पाहिली. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढले गेले. या मोर्चांमध्ये मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील, बीडमधील भाजपाचे आमदार सुरेश धस, अजित पवार आणि शरद पवार गटाचे आमदारही उतरले. या प्रकरणाच्या आडून धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील वर्चस्वालाच एकप्रकारे आव्हान देण्यात येत होते, अशीही चर्चा यानिमित्ताने झाली. यामुळे मस्साजोगच्या निवडणुकीकडे केवळ राजकीय नाही तर सामाजिक महत्त्वही प्राप्त झाले होते.

मतदानाच्या दिवशी राडा

निवडणूक कोणतीही असली तरी बीडमधील वातावरण हे कायम तापलेले असते. मस्साजोगमध्ये २८ एप्रिलला मतदान झाले, तेव्हाही गावातील दोन गट एकमेकांसमोर आलेले पाहायला मिळाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षा यंत्रणेने योग्य ती खबरदारी घेतली.

स्वरुपानंद देशमुख काय म्हणाले?

राज्याचे लक्ष लागलेल्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर स्वरुपानंद देशमुख यांनी याचे श्रेय गावातील मतदारांना दिले. माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, माझ्यासमोर बलाढ्य लोक होते. भावनिक वातावरण त्यांच्याबाजूने होते. त्यांच्याकडे पैसाही होता. तरी गावातील मतदार माझ्यामागे खंबीर उभे राहिले. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आधी न्यायाचा लढा लढावा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. पण त्यांनी राजकारणात पडायला नको हवे होते. अश्विनी देशमुख यांना पुढे करून त्यांच्याआडून काही जणांनी राजकारण केले. पण मला आता त्यांच्यावर काहीही आरोप करायचे नाहीत.

“संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी माझ्या भगिनी अश्विनी देशमुख यांच्यापाठी मी शेवटपर्यंत उभा राहिल”, असेही स्वरुपानंद देशमुख म्हणाले.

देशमुख कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय?

संतोष देशमुख यांचे लहान बंधू धनंजय देशमुख हे दोन वर्षांपासून सातत्याने हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. माध्यमांसमोर कुटुंबाची बाजू मांडणे किंवा राजकीय पुढाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ते पुढे येत असतात. यावेळीही पराभवानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, संतोष देशमुख यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाचे जे नुकसान झाले, त्यासमोर हा पराभव काहीच नाही. २० दिवसांच्या प्रचाराच्या काळात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या गावकऱ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. हा पराभव आम्ही स्वीकारतो.

पराभवाची संभाव्य कारणे काय?

२०२२ साली संतोष देशमुख यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय झाला होता. त्यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकांतही त्यांचाच विजय झाला होता स्वरुपानंद देशमुख यांचा विजय झाला असला तरी त्यांना केवळ १३ महिन्यांचा काळ मिळणार आहे. १३ महिन्यांसाठी झालेल्या निवडणुकीतही गावकऱ्यांनी अश्विनी देशमुख यांना नाकारण्याची विविध कारणे पुढे येत आहेत.

संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या मुख्य प्रवाहात कितपत राजकारण करू शकतील, याबाबत संभ्रम होता. तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान धनंजय देशमुख यांच्याकडून झालेली टीका ग्रामस्थांना रुचली नसल्याचे म्हटले जाते. तसेच १३ वर्षांपासून सत्तेबाहेर असूनही गावासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून यंदा स्वरुपानंद देशमुख यांना गावकऱ्यांनी संधी दिली, असेही बोलले जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button