“नागपूरमधील प्रकार सुनियोजित पॅटर्न” : CM देवेंद्र फडणवीस
अर्थसंकल्पीय अधिवेशन : पोलिसांवर हल्ले सहन करणार नसल्याचा इशारा

मुंबई : सकाळची एक घटना घडल्यानंतर पूर्णपणे शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक असा हल्ला केल्याचे समोर येत आहे. कारण जवळपास एक ट्रॉलीभरून दगड सापडले आहेत. काही लोकांनी घरांवर जमा करून ठेवलेले दगड पाहायला मिळाले. शस्त्रे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली. वाहनांची जाळपोळ झाली. ठरवून काही ठराविक घरांना, आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसत आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेबाबत विधानसभेत निवेदन देताना सांगितले.
हेही वाचा : हवा प्रदूषणासाठी कारणीभूत दोन आरएमसी प्लँट चालकाला ‘दणका’
औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यांवर उतरला. यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाल्याचे वृत्त असून रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबवत पोलिसांनी अनेक तरुणांना ताब्यात घेतले. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. नेमके काय झाले, याची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.