Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर द्यावा’; मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई केंद्र सरकारने “राष्ट्रीय क्वांटम मिशन” सुरू केले असून, क्वांटम संगणन, क्वांटम संवाद, क्वांटम सेन्सिंग व क्वांटम मटेरियल्स या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी बनविणे या मिशनचा हा मुख्य उद्देश आहे.

या राष्ट्रीय धोरणाशी पूर्णतः सुसंगत अशी “महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन” राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे .भविष्यातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात सक्षम मनुष्यबळ निर्मिती व आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीवर विशेष भर द्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले.

मंत्री पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार तंत्र शिक्षण संचालनायाने पुढाकार घेऊन राज्यात क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा व संशोधन क्षमता निर्माण करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर केला आहे.

मंत्री पाटील म्हणाले, या उपक्रमांतर्गत तंत्र शिक्षण संचालनालय यांच्या माध्यमातून आयआयएसईआर,पुणे (हब क्वांटम टेक्नॉलॉजी फांऊडेशन) यांना केंद्रस्थानी ठेवून या उपक्रमाकरिता हब अँड स्पोक मॉडेल राबविण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे; वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई; तसेच व्हीएनआयटी नागपूर या अग्रगण्य संस्थांचा सहभाग प्रस्तावित आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये क्वांटम तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांचा समावेश करण्यात येणार असून, क्वांटम सिम्युलेशन प्रयोगशाळांची उभारणी तसेच प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात (2026 ते 2028) सुमारे ₹20 कोटींच्या निधीतून प्राध्यापक प्रशिक्षण, अभ्यासक्रम विकास, आवश्यक पायाभूत सुविधा उभारणी, क्वांटम प्रयोगशाळांची स्थापना तसेच पायलट प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात सुमारे ₹300 कोटींच्या निधीतून संशोधन प्रकल्प पीएच.डी, पोस्ट-डॉक्टोरल प्रशिक्षण, पेटंट नोंदणी व उद्योग सहकार्याला प्रोत्साहन देण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात सुमारे ₹200 कोटींच्या निधीतून विकसित तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण, स्टार्टअप्सची निर्मिती व रोजगारनिर्मितीस चालना देण्यात येणार आहे.

हेही वाचा – ‘अखर्चित निधीच्या विनियोगातून नियोजित विकासकामे पूर्ण करा’; मंत्री नितेश राणे

क्वांटम तंत्रज्ञान हे उदयोन्मुख व बहुविषयक क्षेत्र असल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. विविध अभ्यास व उद्योग क्षेत्रातील अंदाजांनुसार येत्या काळात या क्षेत्रात दरवर्षी सुमारे 25हजार  रोजगार संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात किमान 50 हजार पेक्षा अधिक क्वांटम प्रशिक्षित अभियंते व तज्ज्ञ निर्माण करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने निश्चित केले आहे.

सदर उद्दिष्टपूर्तीसाठी प्रारंभिक स्तरावरच विद्यार्थ्यांना व अध्यापकांना क्वांटम तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याच्या दृष्टीने स्वयंम /एनपीटीईएल या केंद्र शासनाच्या अधिकृत व्यासपीठांवरील क्वांटम संगणन व क्वांटम तंत्रज्ञान विषयावरील अभ्यासक्रमांना विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे.

आतापर्यंत 5 लाख  विद्यार्थी व प्राध्यापकांनी स्वयंम /एनपीटीईएल वरील क्वांटम तंत्रज्ञान आधारित आयआयटी मद्रास, आयआयटी गुवाहाटी, आयसर कलकत्ता, आयआयटी कानपूर या सारख्या नामाकिंत संस्थाव्दारे राबविण्यात येणाऱ्या तीन क्रेडीटसाठी असलेल्या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केलेली आहे. यामुळे राज्यात या क्षेत्रातील मूलभूत ज्ञान व कौशल्यांचा मजबूत पाया निर्माण होत असून, पुढील टप्प्यातील प्रगत प्रशिक्षण व संशोधनासाठी ही बाब अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

हा उपक्रम पूर्णतः शासनाच्या निधीवर अवलंबून न ठेवता सीएसआर, सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उभारणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे योजना आर्थिकदृष्ट्या शाश्वत, उद्योगाभिमुख व परिणामकारक पद्धतीने राबविता येणार आहे. तसेच “महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन” हा उपक्रम “विकसित महाराष्ट्र 2047” या दीर्घकालीन दृष्टीकोनाशी पूर्णतः सुसंगत असून, महाराष्ट्र राज्याला क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशात अग्रगण्य तसेच जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राज्य म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button