मंत्र्यांच्या भ्रष्टाचारामुळे तिजोरीवर ताण; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई | राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार (ता. २३) पासून सुरू झाले असून पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर दिवंगत नेत्यांवर शोकप्रस्ताव मांडण्यात आले. सदस्यांनी भावनिक श्रद्धांजली वाहिल्यानंतर अधिवेशनाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. मात्र मंगळवारी (ता. २४) विधानसभेत आणि विधानपरिषदेत वातावरण तापलेले पाहायला मिळाले. विविध मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले.
यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. पालिकेला अजून जाग आलेली नाही. शहरातील हवा गंभीर पातळीवर पोहोचली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केवळ छापील उत्तर देऊ नये, तर प्रत्यक्ष परिस्थिती जाणून बोलावे. कधीतरी खिडकी उघडून बाहेरची स्थिती पाहावी, असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा : आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यातून ‘शाश्वत व पारदर्शक’ पिंपरी-चिंचवड संकल्प
मराठा आरक्षण आणि कर्जमाफीच्या निवडणूकपूर्व घोषणा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत, असा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ‘लाडकी बहीण’ योजनेतून अनेक महिलांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करत, भ्रष्टाचारामुळेच राज्याच्या तिजोरीवर भार पडत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच राज्याच्या इतिहासात प्रथमच विधानसभेत आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, “भाजप नेमकं कुणाला घाबरत आहे?” असा सवालही त्यांनी केला.
अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे का, असा प्रश्न उपस्थित करत ठोस कारवाईची मागणी केली. दरम्यान, पुण्यात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा उल्लेख करत गृहखात्याच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.




